संगमनेर Live | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या टीमची खा. राहुल गांधी यांनी विशेष भेट घेतली. यावेळी महाराष्ट्रातील युवक काँग्रेसच्या पक्षबांधणी कार्यासोबतच कोव्हिड-१९ च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेबाबतही चर्चा झाली. महामारीच्या काळात युवक काँग्रेसकडून संपूर्ण महाराष्ट्रभर मदतीचा ओघ सुरू होता. या काळात उत्तम कामगिरी करणाऱ्या टीमचा राहुल गांधी यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
स्थानिक स्तरापासून ते अगदी सोशल मीडियावर युवक काँग्रेसकडे मदतीचा ओघ सुरू होता, ज्यासाठी कार्यकर्त्यांनी दिवसरात्र एक करून मदतकार्य केले होते. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसकडून महाराष्ट्रभर कोव्हिड हेल्पलाईन सुरू करण्यात आली होती, जी आजही कार्यरत आहे. या हेल्पलाईनच्या माध्यमातून महाराष्ट्रभर हजारो रुग्णांना मदत पोहोचवण्यात आली. ऑक्सिजन, रक्त, प्लाज्मा, महत्त्वाची औषधे व रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यासाठीही स्थानिक पातळीवर युवक काँग्रेसची टीम नेहमीच तत्पर होती.
या हेल्पलाईन सोबतच समाज माध्यमांतही मदतीसाठी अनेक विनंत्या येत होत्या. त्यासाठी सोशल मीडियाची एक टीमदेखील २४ तास कार्यरत होती. युवक काँग्रेसचे अधिकृत ट्विटर खाते आणि प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या अधिकृत ट्विटर खात्यास टॅग करून, तसेच हॅशटॅग अभियानाद्वारे, लोक मदत मागत होते व युवक काँग्रेसकडून त्यांना तात्काळ मदत पोहोच केली जात होती.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस ही पहिली अशी राजकीय संस्था ठरली आहे, जिने स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कोव्हिड-१९ साठी प्रत्येकी १ लाखाचे मेडीक्लेम केले आहे. त्यामुळे केवळ जनतेची काळजी नाही, तर जनतेसाठी २४ तास कटीबद्ध असणाऱ्या कार्यकर्त्यांचीही काळजी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस घेत आहे.
अशा मेहनती टीमचं कौतुक करण्यासाठी राहुल गांधी यांनी दिल्ली येथे बोलावून जनतेची सेवा करण्यासाठी मार्गदर्शन केले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष यांनी ट्विटर व फेसबूकवरून या सत्काराबद्दल संपूर्ण टीमकडून राहुल गांधी यांचे जाहीर आभार मानले. “ युवक काँग्रेसने कोव्हिड-१९ च्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रभर मदतीची मोठी फळी तयार केली होती. त्यामुळे हा सत्कार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रत्येक सदस्याचा आहे ” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
या सत्कारावेळी प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्यासह उपाध्यक्ष कुणाल राऊत व शिवराज मोरे, सचिव अनुराग भोयर, सचिव फेजलूर कुरैशी, पालघरचे जिल्हाध्यक्ष सत्यम ठाकूर, नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष सुबीन थॉमस, अमरावतीचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.