◻ दैव बलवत्तर.. आश्वी खुर्द च्या उप सरपंचासह त्याचा मित्र बाल-बाल बचावले.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील शिबलापूर - संगमनेर मार्गावर ‘ द बर्निंग कारचा ’ थरार गुरुवारी पाहायला मिळाला असून शिबलापूर ते गोसावी फाट्या दरम्यान फोर्ड कंपनीच्या चार चाकी वाहनाला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ही गाडी आगीत पूर्ण जळून खाक झाली आहे.
शिबलापूर - संगमनेर मार्गावर शिबलापूर ते गोसावी फाट्या दरम्यान चार चाकी फोर्ड कंपनीच्या (एम. एच. ०५ ए. जे. ७७१४) सुनिल मांढरे याच्यां मालकीच्या गाडीला गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. यावेळी भर रस्त्यात चालत्या गाडीने अचानक पेट घेतला.
यामुळे ही गाडी आगीत पूर्ण जळून खाक झाली. मात्र प्रसंगावधान राखत आश्वी खुर्दचे उप सरपंच सुनिल तुकाराम मांढरे आणि त्याचे मित्र उमेश गाडे वेळीच त्यातून बाहेर पडले. त्यामुळे ते दोघेही सुखरुप बचावले आहेत.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच आग विझवण्यासाठी संगमनेर नगरपरिषदेच्या अग्निशामक बंबाने घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्नं केला. मात्र या दुर्घटनेत ती गाडी पूर्ण जळून खाक झाली असली तरी दैव बलवत्तर म्हणून सुनिल मांढरे व उमेश गाढे हे बाल - बाल बचावले आहेत.