संगमनेर Live | सध्या राज्यातील पोलीस भरती व केंद्रातील सैन्य भरतीसाठी अनेक युवक व युवती अर्ज करत असून या सर्वांना भरती करता जाण्यासाठी कोरोना लसीकरण अनिवार्य आहे. या विद्यार्थ्याची गैरसोय लक्षात घेऊन राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या सूचनेवरून सर्व विद्यार्थ्यांसाठी लसीकरण कॅम्प आयोजित केला होता. यामध्ये आज २१० युवकाचे लसीकरण करण्यात आले.
सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीत या लसीकरण कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. सध्या सर्वत्र भरती सुरू असून या सर्व भारतीयांमध्ये कोरोना लसीकरण आवश्यक केली आहे. यासाठी अनेक युवक सातत्याने विविध ठिकाणी लसीकरणासाठी प्रयत्न करत होते. या सर्वांची अडचण लक्षात घेऊन राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी आपल्या यशोधन संपर्क कार्यालयात या सर्व विद्यार्थ्यांना नाव नोंदणीसाठी आवाहन केले होते. मागील आठ दिवसांमध्ये यशोधन कार्यालयात २१० तरुणांनी लसीकरण्यासाठी आपले नाव नोंदवले. या सर्व तरुणांचे आरोग्य विभागाच्या मदतीने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडासंकुल येथे लसीकरण करण्यात आले आहे.
यावेळी बोलताना सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, कोरोनाच्या संकटानंतर सध्या पोलीस व सैन्य भरतीसाठी अनेक तरुण प्रयत्न करत आहेत. या सर्वाना लसीकरण करणे आवश्यक असून विद्यार्थ्याची गैरसोय लक्षात घेता ना. बाळासाहेब थोरात आमदार डॉ. सुधीर तांबे व इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन मध्ये सर्व विद्यार्थ्याची नाव नोंदणी करण्यात आली. ज्या तरुण व विद्यार्थ्यानी नाव नोंदणी केली होती त्यांचे आज लसीकरण करण्यात आले. यापुढे ज्या युवकांना भरतीत जाण्यासाठी लसीकरण करायचे आहे त्यांनी आपले नाव नोंदणी करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
दरम्यान लसीकरणाची ही तातडीची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल तालुक्यातील सैन्य भरतीसाठी जाणाऱ्या तरुण तरुणींनी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.