◻ अनिल पाटील या शेतकऱ्याचे पत्र सोशलमिडीयात तुफान वायरल.
संगमनेर Live | आसमानी व सुलतानी संकटामुळे हताश झालेला शेतकरी आता शेतमालाला हमीभाव ही मिळत नसल्याने मोठ्या संकटात सापडला असून गुरुवारी सोलापूरच्या शेतकऱ्याने थेट गांजा लागवडीसाठी जिल्हाधिकाऱ्याकडे परवानगी मागीतल्याचे पत्र सोशलमिडीयात वायरल झाल्याने पुन्हा एकदा हताश झालेल्या शेतकऱ्याचे दुख आधोरेखित झाले आहे.
गुरुवारी सकाळपासून सोशलमिडीयाच्या विविध माध्यमातून शेतीत उत्पन्न मिळत नसल्याने माझ्या शेतात दोन एकर गांजा लावण्यास परवानगी मिळावी अशा आशयाचे निवेदन मोहोळ तालुक्यातील एका शेतकऱ्यानं जिल्हाधिकारी याना दिल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये अनिल आबाजी पाटील यांची शिरापूर (सो)., ता. मोहोळ येथे स्वत:च्या मालकीची जमीन गट नं. १८१/४ असून या क्षेत्रात दोन एकर गांजा लावण्यासाठी प्रशासनाने परवानगी दयावी असे निवेदन जिल्हा व पोलीस प्रशासनाला दिले आहे.
अनिल पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मी शेतकरी असून कोणतेही पिक केले तरी त्याला शासनाचा हमी भाव नसल्यामुळे शेती तोट्यात करावी लागत आहे. शेतीमालाला कवीडमोल भाव मिळत असल्यामुळे शेती करणे कठीण झाले आहे. मशागतीसाठी केलेला खर्च देखील मिळत नाही. तसेच एखाद्या साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला असता त्याचे देखील बिल लवकर मिळत नाही. त्यामुळे गांजाला चांगला भाव असल्यामुळे मला माझ्या वर नमुद गटामध्ये दोन एकर गांजा लागवड करण्याची दि. १५/०९/२०२१ पर्यंत लेखी परवानगी दयावी अन्यथा मी दि. १६/०९/२०२१ या दिवशी आपल्या प्रशासनाकडून परवानगी मिळाली असे गृहित धरुन मी लागवड सुरु करणार आहे व माझ्यावर गुन्हा दाखल झाला तर त्यास आपले प्रशासन जबाबदार राहील असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
सोशलमिडियात हे पत्र तुफान वायरल होत असून दारुच्या दुकानातून अर्थव्यवस्थेला हातभार लागत असेल तर शेतकऱ्याला शेतात गांजा लावण्याची परवानगी देण्यास काय हरकत.? असा टोला सोशमिडियातून शासनकर्त्याना लगावला जात आहे.
दरम्यान या पत्राबाबत हकीगत जाणुन घेण्यासाठी संगमनेर Live ने अनिल पाटील यांच्याशी संपर्क केला असता त्याना साडेचार एकर शेत जमीन असल्याची माहिती त्यानी देऊन यामध्ये केळी पिक लागवड केल्याचे सांगितले. या पिकावर त्याचे ४ लाख ५० हजार खर्च झाले. मात्र माल विकल्यानतंर २० पैसे किलो दराने हातात अवघे ७ हजार शिल्लक राहिले. त्यामुळे हा तोटा कसा भरुन काढायचा असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच पत्र वायरल झाल्यानतंर सकाळपासून महाराष्ट्रातील शेकडो शेतकऱ्यानी फोन करुन धीर दिल्याचे सागितले आहे.