◻ आश्वी परिसरातील बांधकाम क्षेत्रातील ११९ कामगारांच्या कुटूंबियांना अटल विश्वकर्मा योजनेच्या संरक्षण संच व आरोग्य रिपोर्टचे आ. विखे पाटील यांच्या हस्तें वितरण.
संगमनेर Live | देशातील असंघटीत कामगारांना सामाजिक आणि आरोग्य सुरक्षा देण्याचे महत्त्वपूर्ण काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अटल विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून केले असल्याचे प्रतिपादन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शिर्डी विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या संगमनेर तालुक्यातील बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत ११९ कामगारांच्या कुटूंबियांना अटल विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून मंजूर झालेल्या संरक्षण संचाचे व आणि आरोग्य रिपोर्टचे वितरण आ. विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तहसिलदार अमोल निकम, वनविभागाचे उपविभागीय अधिकारी संदीप पाटील, नायब तहसिलदार गणेश तळेकर आदीसह जेष्ठ व तरुण पदाधिकारी उपस्थित होते.
आपल्या भाषणात आ. विखे पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने समाजातील विविध घटकांना योजनांची उपलब्धता करुन त्याची अंमलबजावणी सुरू केली. या योजनांमुळे सामाजिक सुरक्षा मिळाली. आज देशात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कामगारांना संरक्षण कवच अटल विश्वकर्मा योजनेच्या माध्यमातून मिळाले आहे. या योजनेतून कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी अर्थसहाय्य आणि आरोग्य सुविधा उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी सांगितले. जनसेवा कार्यक्रमाच्या माध्यमातून यासर्व कामगारांना अटल विश्वकर्मा योजनेचा लाभ मिळावा, म्हणून स्वतंत्र कक्ष सुरु करण्यात आला आहे. या कामगारांची आरोग्य तपासणीही करण्यात आली असून, त्याचे अहवालही कामगारांना सुपूर्द करण्यात आले आहेत. भविष्यातही या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करुन कामगारांना या योजनेचा लाभ मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी दिली.
आश्वी आणि परिसरातील सर्वच प्रश्नांचा पाठपुरावा करून येथील विकासकामांना निधीची उपलब्धता सातत्याने करुन दिली जात आहे. कोव्हीड संकटात नागरिकांना मोफत सुविधा उपलब्ध करुन दिल्याचे समाधान मोठे आहे. काहीजण इथे येवून फक्त वातावरण निर्माण करतात. राजकारणाच्या पलीकडे जावून काही निर्णय करावे लागतात. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना पन्नास टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेतला. राज्यात असा निर्णय करणारी आपली एकमेव संस्था असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ. रोहीणी निघुते यांनी आपले मनोगत व्यक्त केले.