◻ राखी बांधून भारतीय सैनिकांचा जय हिंद महिला मंचच्या वतीने सन्मान.
संगमनेर Live | ऊन, वारा, पाऊस अशा वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय सीमेवर दिवस-रात्र सेवा करणाऱ्या सैनिकांप्रती आदर व्यक्त करत जय हिंद महिला मंचच्या वतीने महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली २५०० राख्या पाठविल्या असून तालुक्यातील आजी माजी सैनिकांचे राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले.
संगमनेर येथिल यशोधन संपर्क कार्यालय या ठिकाणी जयहिंद महिला मंच व स्वराज्य कल्याण सैनिक समितीच्या वतीने रक्षाबंधन आयोजित करण्यात आले होते .यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, मेजर दर्शन चौधरी, प्रकाश कोटकर, रावसाहेब कोटकर, राजेंद्र दिघे, भानुदास पोखरकर, प्रशांत चिखले, राजेंद्र वर्पे, सुनील थोरात, विक्रम थोरात, राजेंद्र पाचपिंड, प्रकाश लामखडे, संजय राहणे हे आजी-माजी सैनिक यांसह पंचायत समितीच्या सभापती सौ. सुनंदाताई जोर्वेकर, सौ. निर्मलाताई गुंजाळ, सौ. अर्चनाताई बालोटे, सौ. सुनीताताई कांदळकर आदी उपस्थित होत्या.
याप्रसंगी पश्चिम बंगाल येथील बिनागुढी येथे ५०० राख्या, जम्मू काश्मीर येथे १ हजार राख्या, पुणे येथे ५०० तर राजस्थानमध्ये ५०० राख्या सध्या सेनादलात कार्यरत असणाऱ्या सैनिकांकडे त्या विभागातील युनिट करता पाठविण्यात आल्या.
याप्रसंगी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, भारतीय जवानांचा प्रत्येक भारतीयाला सदैव अभिमान राहिला आहे. ऊन, वारा, पाऊस अशा विविध प्रसंगात ही सैनिक रात्रंदिवस सीमेवर पहारा करत असतात. त्यामुळे आपण देशात सुरक्षित असतो. कोणताही सण असो ते आपल्या कुटुंबीयांसमवेत नसतात. या भावनेतून जय हिंद महिला मंचच्या वतीने मागील पाच वर्षापासून दिवाळी करता फराळ पाठवणी करण्यात येते. तसेच रक्षाबंधनानिमित्त दरवर्षी सैनिकांप्रति आदरभाव व्यक्त करत राख्या ही पाठवल्या जातात हा उपक्रम अत्यंत स्तुत्य असून भारत देश व सैनिकांप्रति प्रत्येकाने सदैव अभिमान बाळगावा असे आवाहन त्यांनी केले
नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, आपण सर्वजण विविध सण घरांमध्ये आनंदाने साजरे करतो. मात्र हे सैनिक बांधव देशाच्या सीमेवर पहारा करतात. डोंगराळ बर्फाळ प्रदेशात रात्र-रात्र उभे राहतात. कुटुंबापासून हजारो किलोमीटर दूर असतात. त्यांच्या प्रती आदर व्यक्त करताना जय हिंद महिला मंचच्या वतीने नामदार बाळासाहेब थोरात आ. डॉ. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मागील पाच वर्षापासून विविध उपक्रमातून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. या वर्षी तालुक्यातील विविध आजी माजी सैनिकांना महिला भगिनींच्या वतीने राखी बांधण्यात आल्या आहेत तर २५०० राख्या विविध ठिकाणी पाठवण्यात आले आहेत.
यावेळी जयहिंद महिला मंचच्या ज्योती अभंग, स्मितल अभंग, दिपाली वर्पे, सुवर्ण कोटकर, शालन गुंजाळ, पुष्पा कोल्हे, सुषमा भालेराव, वैशाली पाचपिंड, प्रतिभाताई गडाख आदी महिला भगिनी उपस्थित होत्या. दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक प्रकाश कोटकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर जय हिंद महिला मंचच्या सचिव सौ. सुनीताताई कांदळकर यांनी आभार प्रदर्शन केले आहे.