◻ आश्वी सह पंचक्रोशीतील अनेक गावे आठवड्याभरासाठी लॉकडाऊन.
संगमनेर Live | कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने राज्यसरकारने अलीकडेच लॉकडाऊनचे निर्बध हळूहळू शिथील करत दैनंदिन व्यवहार सुरळीत केले होते. त्यामुळे जनसामान्याचे आयुष्य हळूहळू पूर्वपदावर यायला सुरुवात झाली असतानाच संगमनेर तालुक्यासह ग्रामीण भागात मागील काही दिवसापासून कोरोनाने पुन्हा उसळी घेतली. त्यामुळे तिसरी लाट येऊ नये यासाठी उपायोजना म्हणून प्रशासनाने तालुक्यातील १० पेक्षा अधिक कोरोना बाधीत रुग्ण उपचार घेत असलेली गावे लॉकडाऊन करण्यास सुरवात केली. यामुळे नागरीकानमध्ये भिती तर कोरोनाने अर्थिक कबरडे मोडलेल्या व्यापारी वर्गात मोठा असंतोष निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
ऑक्टोबरमध्ये देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा आदांज राष्ट्रीय आपत्ती निवारण संस्थेने वर्तवला आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सातत्याने मोठ्या प्रमाणात कोरोना बाधीत रुग्ण आढळून येत असल्यामुळे महाराष्ट्रात तिसऱ्या लाटेला संगमनेर तालुक्यातून सुरवात होत असल्याचे घातक चित्र दिवसे दिवस ठळक होत चालले आहे. तर महाराष्ट्रात मोठ्या वेगाने लसीकरण सुरू असल्याने तिसरी लाट महाराष्ट्रात येणार नसल्याचे तंज्ञाचे मत असले तरी संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्येची आकडेवारी पाहता ती तंज्ञाच्या अदांजाला छेद देणारी आहे.
२४ सप्टेंबर २०२१ अखेर संगमनेर तालुक्यात ३२ हजार ३२९ बाधीत रुग्णापैकी ३१ हजार ३४७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून ८७९ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये आश्वी परिसरातील उंबरी बाळापूर ८, आश्वी बुद्रुक १९, आश्वी खुर्द २७, निमगावजाळी २६, शेडगाव २१, पानोडी १७, कनोली १५, खळी १२, मनोली १२, चिचंपूर खुर्द ११, पिप्रीं लौकी अजमपूर ११, प्रतापपूर ११, मालुंजे १०, शिबलापूर १०, दाढ खुर्द ३, औरंगपूर २, हंगेवाडी २, ओझर बुद्रुक २, ओझर खुर्द २, झरेकाठी २ बाधीत रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे १० पेक्षा अधिक रुग्ण असलेली आश्वी पंचक्रोशीतील आश्वी बुद्रुक ५ ऑक्टोबर, आश्वी खुर्द, पिप्रीं लौकी अजमपूर व पानोडी १ ऑक्टोबर, शेडगाव व निमगावजाळी ३ ऑक्टोबर, मालुंजे ६ ऑक्टोबर पर्यंत ही गावे प्रशासनाने लॉकडाऊन केली आहेत.
मागील दिड वर्षापासून कोरोनाने अर्थिक कबरडे मोडलेला व्यापारी वर्ग कोठे स्थिर स्थावर होत असताना पुन्हा एकदा प्रशासनाने गावे लॉकडाऊन गेल्यामुळे अर्थव्यवस्था कोलमडणार असल्याने आश्वी सह पंचक्रोशीतील लॉकडाऊन करण्यात आलेल्या गावातील व्यापारी वर्गाने या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान नागरीकानी गर्दीची ठिकाणं टाळणं आणि कोरोनाचे नियम पाळणं हेच आपल्या हातात आहे. त्यामुळे आपल्याला सावधच राहावे लागणार असल्याचे आवाहन निमगावजाळी आरोग्य केद्रांचे प्रमुख डॉ. तय्यब तांबोळी यानी केले आहे.
ऐन सणासुदीच्या काळात प्रशासनाने ग्रामीण भागातील गावे बंद करण्याचे आदेश दिल्याने दिड वर्षा पासून आडचणीत सापडलेल्या व्यापारी वर्गात खळबळ उडाली आहे. व्यापारी वर्गाने कर्ज काढून दिवाळी सणासाठी मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी केली असून पुन्हा लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येणार आहे. त्यामुळे प्रशासनाने संपूर्ण गाव बंद न करता शहरी भागाप्रमाणे ‘ मिनी कंन्टेमेंट झोन ’ बनवावेत व व्यापारी वर्गाला दिलासा द्यावा. अशी मागणी व्यापारी वर्गाची असून शनिवारी शासकीय नियमाचे पालण करत बैठक आयोजित केल्याची माहिती व्यापारी असोसिएशनचे योगेश रातडीया यानी दिली आहे.