सत्तेत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निळवंडे कालव्यांच्या कामाला गती - ना. बाळासाहेब थोरात

संगमनेर Live
0
संगमनेर कारखान्याची ५४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न.

संगमनेर Live | शेती ही व्यावसायिक पद्धतीने करताना शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करत एकरी उत्पादन क्षमता सरासरी १०० मेट्रिक टन होईल असे नियोजन करावे. याचबरोबर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी निळवंडे कालव्यांच्या कामाला अत्यंत गती दिली असून पुढील वर्षीच्या पावसाळ्यातील पाणी उजव्या व डाव्या दोन्ही कालव्याद्वारे दुष्काळी भागात आणण्यासाठी आपला प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ होते. व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, रणजितसिंह देशमुख, नगराध्यक्ष सौ. दुर्गाताई तांबे, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजीत थोरात, शंकरराव खेमनर, उपाध्यक्ष संतोष हासे, अमित पंडित, साहेबराव गडाख, आर. बी. राहणे, अ‍ॅड. प्रदीप मालपाणी, अ‍ॅड. सुहास आहेर, गणपतराव सांगळे, सुभाष सांगळे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते. यामध्ये ऑनलाइन प्रणालीद्वारे विविध सभासदांनी सहभाग घेतला.

महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात म्हणाले की, सध्याची कोरोना ची परिस्थिती चिंताजनक आहे. संगमनेर तालुका व अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी नियम पालन करणे गरजेचे आहे. भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या. कोरोना अद्याप संपलेला नाही म्हणून प्रत्येकाने काळजी घ्या. याचबरोबर संगमनेरचा सहकार अत्यंत दिशादर्शक असून सहकाराचे हे मॉडेल राज्यासाठी आदर्श ठरले आहे. संगमनेर तालुक्यातील रचनात्मक काम, सुसंस्कृत राजकारण, ग्रामीण विकास याचबरोबर येथील सहकारी संस्था या सर्वसामान्यांच्या विकासासाठी काम करत आहे. कारखान्याने एक रकमी एफआरपी देताना उच्चांकी भाव दिला आहे. नव्या ५५०० मेट्रिक टन कारखान्याचा हा पाचवा हंगाम असून यावर्षी वीज निर्मितीतून ५० कोटी पेक्षा जास्त उत्पादन मिळाले आहे. आपल्या कार्यक्षेत्रात जास्तीत ऊस उत्पादन करताना एकरी उत्पादन वाढले पाहिजे. यासाठी विशेष यंत्रणा वाढवा. यामुळे वाहतूक खर्च कमी होणार असून कारखान्याला फायदा होणार आहे आणि त्याचा सरळ फायदा ऊस उत्पादक व सभासदांना मिळणार आहे.

निळवंडे धरण आपण पूर्ण केले. मध्यंतरीच्या काळामध्ये मागील पाच वर्षात काम थांबले होते. ज्या ठिकाणी दोन जेसीबी काम करत होते तेथे महाविकासआघाडी सतत सत्तेत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी ३५ जेसीबी कामाला लावले. विविध ठिकाणचे कंस्ट्रक्शन चे कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उजव्या व डाव्या कालव्याचे काम अत्यंत वेगाने सुरू आहे. यामध्ये अकोले तालुक्यातील नागरिकांचे मोठे सहकार्य लाभले. २०२२ च्या पावसाळ्यातील पाणी या दोन्ही कालव्याद्वारे दुष्काळी भागात पोहोचवण्यासाठीच आपला प्रयत्न असल्याचे नामदार थोरात यांनी म्हटले आहे .

नव्याने महसूल विभागात ई पीक पाहणी, ऑनलाईन सातबारा, ई फेरफार सुरू केला आहे. ई पीक पाहणी मुळे शेतकऱ्यांना कोणत्या पिकाचे किती लागवड झाली त्याची सहज माहिती उपलब्ध होणार आहे व याची तातडीने नोंद सातबारावर होणार आहे. आधुनिकतेमुळे महसूल विभाग हा लोकाभिमुख होत असून कोरोना काळामध्ये चांगला निधीमधून तालुक्याच्या विकासकामे मार्गी लावली आहे. आगामी काही दिवसांमध्ये प्रत्येक गावांमध्ये शाळा सुरू होत असताना आपल्या गावातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही यासाठी कार्यकर्त्यांनी अधिकाधिक काम करताना चांगले नियोजन करावे असे आवाहनही त्यांनी केले.

आमदार डॉ. तांबे म्हणाले की, महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचा सहकार हा देशाला दिशादर्शक ठरला आहे .सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची आदर्श सहकाराची तत्वे आजही जपली जात आहे .सहकार्याचे पावित्र्य राखून काम केले असल्यामुळे सर्व संस्था या प्रगतीपथावर आहेत. उत्कृष्ट नियोजन, उत्कृष्ट व्यवस्थापन हा मूलमंत्र जपताना सर्वसामान्यांचा विकास या सहकारी संस्थांच्या माध्यमातून साधला जात आहे. कारखान्याचे काम अडचणीच्या काळात ही अत्यंत कौतुकास्पद असल्याचे ते म्हणाले.

बाबासाहेब ओहोळ म्हणाले की, राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने मागील हंगामात १३ लाख १९ हजार मेट्रिक टनाचे गाळप करत १३ लाख ३६ हजार क्विंटल साखर उत्पादन केले. एकरी उत्पादन वाढवण्यासाठी कार्यक्षेत्रातील ९७ ऊस प्लॉटची निवड करण्यात आली असून या माध्यमातून ठिबक बरोबर जास्तीत जास्त नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्यावर भर देणारे येत असल्याचे त्यानी सांगितले. वार्षिक सभेच्या नोटीस चे वाचन कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले. सूत्रसंचालन नामदेव कहांडळ यांनी तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !