◻ उर्जा मंत्री ना. नितीन राऊत यांना आ. विखे पाटील यांचे पत्र
संगमनेर Live (लोणी) | वीज वितरण कंपनीने थकित वीज बिलाच्या कारणाने रोहीत्र बंद करण्याचे आदेश मागे घ्यावेत अशी मागणी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उर्जामंत्र्यांकडे केली आहे. ऐन रब्बी हंगामात वीज पुरवठा खंडीत करुन शेतकऱ्यांची कोंडी निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्यास तिव्र आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
विविध गावांमधील शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळांनी आ. विखे पाटील यांची भेट घेवून गावोगावी राहीत्र बंद करण्याच्या संदर्भात वीज वितरण कंपनीने धडाका लावला असल्याच्या तक्रारी केल्या. या पार्श्वभूमिवर आ. विखे पाटील यांनी उर्जा मंत्री ना. नितीन राऊत यांना याबाबत सविस्तर पत्र पाठवून शेतकऱ्यांच्या दृष्टीने या गंभिर बनलेल्या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे.
मागील दोन वर्षांपासुन शेतकरी कोव्हीड संकटाचा सामना करीत आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळेही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या सर्व परिस्थितीवर मात करुन, मोठ्या उमेदीने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील शेती कामाला सुरुवात केली. मात्र वीज पुरवठाच खंडीत होत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
संपूर्ण नगर जिल्ह्यात थकीत वीजबिलाच्या कारणाने रोहीत्र बंद ठेवून शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट करण्याचा सपाटा आधिकाऱ्यांनी लावला आहे. अनेक गावांमध्ये बिलांची रक्कम भरुनही रोहीत्र सुरु नाहीत. अनेक गावांमध्ये रोहीत्रांमधील दुरुस्ती वेळेवर होत नसल्याने शेतीसाठीचा वीजपुरवठा पुरेश्या दाबाने होत नसल्याने शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करणे अवघड बनल्याची बाबत आ. विखे पाटील यांनी उर्जा मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.
वीज वितरण कंपनीच्या या कारभारा विरोधात शेतकऱ्यांमध्ये चिड निर्माण झाली असून, एकप्रकारे शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न आधिकाऱ्यांकडून सुरु असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहे. वीजेच्या कारणाने ग्रामीण भागात शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत असलेला असंतोष लक्षात घेवून थकीत बिलांच्या कारणाने रोहीत्रांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा आदेश मागे घ्यावा. तसेच नादुरुस्त रोहीत्रांची तातडीने दुरुस्ती करुन, शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा अशी मागणी आ. विखे पाटील यांनी केली आहे.