◻ आश्वी बुद्रुकचे उपसरपंच राहुल जऱ्हाड यांचा ३ एकर ऊस पाणी असूनही वीजेअभावी जळून खाक.
संगमनेर Live | मागील अनेक दिवसापासून चर्चेत असणाऱ्या महावितरण विभागाचा गलथान कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून यावेळी संगमनेर तालुक्यातील आधी बुद्रुक येथील प्रगतीशील शेतकरी व गावचे विद्यमान उपसरपंच राहुल जऱ्हाड यांच्यासह स्थानिक शेतकऱ्याना याचा फटका बसल्याने शेतकऱ्याची ऊस पिके पाणी असूनही वीजेअभावी जळून खाक झाल्याने महावितरणाच्या गलथान कारभारावर शेतकऱ्यानमधून तीव्रं संताप व्यक्त होत आहे.
याबाबत उपसरपंच राहुल जऱ्हाड यानी दिलेली माहिती अशी की, आश्वी शिवारात गट नंबर २५५ मध्ये त्याच्या मालकीची ३ एकर शेती असून त्यात त्यांनी ऊस लागवड केलेली आहे. ऊसाचे पिक पूर्णतः वाढलेले असून त्यास अंतिम पाणी देण्याचे नियोजन दिवाळी पूर्वी केले होते. परंतु वीजेचा ट्रान्सफॉर्मर नादुरुस्त असल्या कारणाने महावितरणच्या आश्वी बुद्रुक कार्यालयातील कनिष्ठ अभियंता सोनवणे व कार्यकारी अभियंता थोरात याना याबाबत माहिती दिली होती. परंतु तरीही महावितरणने हलगर्जीपणा करत दिवाळीपूर्वी केलेल्या तक्रारीची साधी दखल ही न घेता तोडांला पाने पुसली असल्याचे जऱ्हाड यानी म्हटले आहे.
राज्यात सत्ताधारी असलेल्या पक्षाच्याचं उपसरपंचांची अशी अवस्था झाल्याने सर्वसामान्य नागरीकाच्या तक्रांरीचे काय होत असेल.? असा प्रश्न आता परिसरातील नागरिक विचारत आहेत. याबाबत उपसरपंच राहुल जऱ्हाड यानी दिलेली अधिक माहिती अशी कि, हा ट्रान्सफॉर्म आश्वी मांची रोडवर स्थित असून त्याचा क्रमांक २०८२४०९ असा असून त्यावर १५ शेतकऱ्याचे वीज कनेक्शन आहेत. त्यामुळे या १५ शेतकऱ्याचे महावितरणच्या या ढिसाळ कारभारामुळे प्रचंड मोठे नुकसान झालेल्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरीकानमधून तीव्रं संताप व्यक्त होत आहे.
दरम्यान जऱ्हाड यांचा ३ एकर ऊस महावितरणच्या गलथान कारभारामुळे जळाल्याने संगमनेर भाग सहकारी कारखान्याकडे स्पेशल केस करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. तर हाता-तोंडाशी आलेली पिके डोळ्यादेखत जळाल्यामुळे महावितरण आता तरी स्थानिक शेतकऱ्याना न्याय देणार का.? अशी विचारणा नागरीकानी करुन शासन स्तरावरून नुकसानग्रस्त शेतकऱ्याला मदत द्यावी अशी मागणी केली आहे.
महावितरणच्या कामचुकारीचा फटका माझ्यासह परिसरातील स्थानिक शेतकऱ्याना बसलेला असून वीजबिल नियमित भरून देखील २५ दिवस उलटूनही आमचे ट्रान्सफॉर्मर दुरुस्त झालेला नाही. त्यामुळे आमच्यासमोर आत्मदहन करण्यावाचून पर्याय नसल्याने नादुस्त ट्रान्सफॉर्मर दुरुस्त न करणाऱ्या महावितरणच्या कामचुकार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
राहुल जऱ्हाड,
उपसरपंच व प्रगतशील शेतकरी आश्वी बुद्रुक