◻ नगर जिल्ह्यातील १९२ ग्रामपंचायती मधील २७४ रिक्त जागांसाठी पोटनिवडणूक.
संगमनेर Live | राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानवये अहमदनगर जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झालेला आहे. यामध्ये संगमनेर तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीचा समावेश असून या १६ गावासह लगतच्या गावानमध्ये आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुक २०२१ करीता मा. राज्य निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी. तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्यावी. अशा सुचना करण्यात आल्याची माहिती मिळाली आहेत.
निधन, राजीनामा, अपात्रता व इतर अन्य कारणांमुळे रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्य पदासाठी राज्यातील ४५५४ ग्रामपंचायतीमधी ७१३० रिक्त जागांच्या पोट निवडणूकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान घेण्यात येणार आहे. अहमदनगर जिल्हयातील १९२ ग्रामपंचायती मधील २७४ रिक्त जागांसाठी मतदान होणार असून यामध्ये संगमनेर तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीमधील रिक्त जागाचा समावेश आहे.
ग्रामपंचायत पोटनिवडणूक २०२१ मध्ये संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक, बोरबन, खराडी, कोंची मांची, कुरकुटवाडी, म्हसवंडी, मिरपुर, निमगांव जाळी, निमगांव टेंभी, पळसखेडे, समनापुर, वडगांव लांडगा, मिर्झापूर, चिंचपुर, काकडवाडी, ओझर खुर्द या ग्रामपंचायतीमधील जागा रिक्त झाल्यामुळे याठिकाणी पोटनिवडणुक घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट आहे.
त्यामुळे पोट निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतीच्या संबंधित प्रभागाच्या क्षेत्रात निवडणूक प्रक्रिया चालू झाल्यापासून ते त्या त्या ठिकाणच्या निवडणुक निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचार संहिता लागू करण्यात आली असून ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये व आचारसहिंतेचा भंग होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना करण्यात आल्या आहेत. तसेच पोटनिवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या सीमेलगतच्या गावांमध्ये सुध्दा आचारसंहिता लागू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
या निवडणूकांसाठी ३० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर २०२१ या कालावधीत उमेदवारी अर्ज दाखल करता येईल. ९ डिसेंबर २०२१ उमेदवारी अर्ज माघारी घेता येईल. २१ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. २२ डिसेंबर रोजी मतमोजणी करण्यात येणार आहे. या निवडणूकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने १२ नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार यादी व अंतिम मतदार यादी १८ नोव्हेंबर रोजी प्रसिध्द केली आहे.
दरम्यान आश्वी बुद्रुक येथिल अर्चना भास्कंर गायकवाड, चिचंपूर येथिल राहुल राधाकिसन तांबे व निमगावजाळी येथिल शिवनाथ सर्जेराव डेगंळे या ग्रामपंचायत सदंस्याचे निधन झाल्यामुळे तर ओझर खुर्द येथिल एका महिला सदंस्याचे पद रद्द झाल्याने येथिल ग्रामपंचायत सदंस्याची जागा रिक्त झाल्यामुळे पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.