संगमनेर Live | केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत उद्या संपन्न होत असलेल्या राज्यातील पहिल्या सहकार परिषदेचे आणि शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी आणि प्रवरा परिवाराच्या वतीने करण्यात आली असून, या परिषदेस उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या स्वागतासाठी सहकाराची पंढरी सज्ज झाली आहे.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी देशात प्रथमच स्थापन केलेल्या सहकार मंत्रालयाचा पदभार स्विकारल्यानंतर सहकार मंत्री अमित शाह प्रथमच महाराष्ट्रात आणि तेही सहकार चळवळीची सुरुवात झालेल्या प्रवरानगर येथे येत असल्याने या दौऱ्याचे महत्व राज्याच्या दृष्टीने विशेष मानले जाते. केंद्र सरकारने सहकारी साखर कारखाने, नागरी सहकारी बॅका यांच्या बाबतीत घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची अंलबजावणी सुरु झाली आहे. या व्यतीरिक्त महाराष्ट्रात रुजलेल्या सहकार चळवळीच्या दृष्टीने मंत्री अमित शाह कोणती घोषणा करतात याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सहकार परिषदेस रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे, अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकारी बॅकेचे चेअरमन विद्याधर अनास्कर, राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्यासह सहकारी चळवळीमध्ये काम करणारे मान्यवर तसेच खासदार, आमदार आणि सहकारी संस्थाचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे या सहकार परिषदेचे निमंत्रक आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.
सहकार परिषद आणि शेतकरी मेळाव्याची जय्यत तयारी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर करण्यात आली आहे. यासाठी भव्य सभामंडप, व्यासपीठ, उभारण्यात आले असून, २० ते २५ हजार सहकारी चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहतील असे नियोजन करण्यात आले आहे. मंत्री अमित शाह यांचे ११ वा. कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होणार असून, सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या स्मृतींना उपस्थित मान्यवर अभिवादन करतील.
पद्म पुरस्काराने सन्मानित झालेले जिल्याचे भुमीपुत्र पद्मश्री पोपटराव पवार आणि श्रीमती राहीबाई पोपेरे यांचा गौरव तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कारने सन्मानित झालेले डॉ. रमेश धोंडगे, डॉ. तारा भवाळकर यांचा सन्मान मंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
दरम्यान खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली या संपूर्ण सोहळ्याचे आखीवरेखीव नियोजन करण्यात आले असून, सहकार परिषदेच्या निमित्ताने जिल्ह्यासह राज्यातून येणाऱ्या कार्यकर्त्याच्या स्वागतासाठी सहकार पंढरी सज्ज झाली आहे. जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते, तसेच प्रवरा परिवाराच्या वतीने या सहकार परिषदेच्या नियोजनासाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या आहेत.