◻ प्रदूषीत पाण्याच्या विरोधात नदीकाठच्या ११ गावाचे ठराव.
संगमनेर Live | प्रवरा नदीपात्रात सोडण्यात येत असलेल्या प्रदूषीत पाण्याच्या विरोधात नदीकाठच्या ११ गावांच्या ग्रामपंचायतींनी ठराव करुन, आणि ५ गावांच्या ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पाठवून संगमनेर साखर कारखाना आणि नगरपालिकेच्या विरोधात रणशिंग फुंकले आहे. या संस्थामधून सोडण्यात येणारे रसायनयुक्त पाणी तसेच शहरातील सांडपाण्यामुळे नदीकाठच्या गावांचे आरोग्य धोक्यात आल्याची भावना ग्रामस्थांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे देखील तक्रारीव्दारे मांडली आहे.
संगमनेर भाग सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून मागील अनेक दिवसांपासून रसायनयुकत पाणी नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या संदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे वेळोवेळी तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. हीच परिस्थिती संगमनेर नगरपालिकेनेही मागील अनेक वर्षांपासुन सुरु ठेवली आहे. शहरातील सर्व सांडपाणी प्रवरा नदीपात्रातच आणून सोडले जाते. शहरातील हॉटेल व्यवसायीक, दवाखाने तसेच काही वेळा मैला वाहून नेणारे टॅकरही प्रवरा नदीपात्रात सोडण्याच्या घटना घडल्या.
याबाबत माजी उपसभापती अंकुशराव कांगणे, सरपंच रखमाजी खेमनर, भाजपाचे दादासाहेब गुंजाळ, सचिन शिंदे, रविंद्र गाढे, अर्जुन हाळनोर, सचिन खेमनर आदिंसह विविध गावांच्या ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्र प्रदूषण मंडळाच्या आधिकाऱ्यांची भेट घेवून लेखी तक्रारी सादर केल्या.
यापूर्वी नदीपात्रात मांसाचे तुकडेही टाकण्यात येत होते. या विरोधात वेळोवेळी आंदोलनेही झाली. पालिकेने एसटीपी प्लॅन्ट उभारलेला नाही. त्यामुळे हे सर्व पाणी नदीकाठच्या गावांपर्यंत आता पोहचत आहे. नदीपात्रात हे पाणी साठून राहत असल्याने या पाण्याचा निचरा तिथेच होतो. गावांच्या पाणी पुरवठ्याच्या सर्व विहीरी नदीपात्रात असल्याने हे प्रदूषित पाणी गावांना आता धोक्याचे ठरले आहे. नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी, शेतीसाठी तसेच जनावरांसाठी हेच पाणी वापरावे लागत असल्याने आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले असल्याचे ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.
मागील अनेक दिवसांपासून प्रदूषित आणि दुर्गंधी पाणी नागरीकांना येत असल्याने याचे विपरीत परिणाम नदीकाठच्या गावांसह शहरातील नागरीकांच्या आरोग्यावर परिणाम करणारे ठरले आहेत. प्रदूषित पाणी प्रवरा नदीपात्रात सोडणे बंद करावे याबाबत संबधित संस्थांना वेळोवेळी निवेदन देण्यात आली. शहरातील आणि तालुक्यातील निसर्गप्रेमी नागरीक याबाबत सातत्याने आवाज उठवून प्रशासनाचे लक्ष वेधत आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही ग्रामस्थांनी याबाबतचा पाठपुरावा सातत्याने सुरु ठेवला, मात्र केवळ आश्वासन देवून वेळ मारुन नेली जाते. याचा विपरीत परिणाम आता विविध आजारातून ग्रामस्थांना सहन करावे लागत असल्याची बाब ग्रामपंचायत पदाधिाका-यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आधिकाऱ्यांना सांगितली.
नदीकाठच्या ११ ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांनी या बाबत ठराव करुन, जिल्हाधिकारी राजेंन्द्र भोसले यांची भेट घेवून या गंभिर बाबीकडे लक्ष वेधले आहे. तर अनेक गावांनी ग्रामस्थांच्या सह्यांचे निवेदन सादर करुन, संगमनेर साखर कारखाना आणि नगरपालिकेच्या विरोधात तक्रार दाखल करुन, निर्माण झालेली समस्या लक्षात घेवून संबधित संस्थांना प्रवरा नदीपात्रात प्रदूषित पाणी सोडण्यास बंदी घालावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे केली आहे.
दरम्यान आ. विखे पाटील याच्या शिर्डी मतदार संघातील आश्वी पोलीस स्टेशन अतंर्गत येत असलेली ९ गावे संगमनेर पोलीस स्टेशनला जोडली गेल्यामुळे कॉग्रेसचे जेष्ठनेते ना. बाळासाहेब थोरात व भाजपचे जेष्ठनेते आ. राधाकृष्ण विखे पाटील याच्यात वितुष्ट आल्याचे बोलले जाते. त्यात आता प्रदूषणाच्या मुद्दावरुन जिल्हाधिकारी याना निवेदन दिल्यामुळे पुन्हा एकदा या दोन नेत्याच्या वादात ठिणगी पडल्याने मोठ्या संघर्षाचे चित्र निर्माण झाले आहे.