ओमायक्रॉन विषाणू संसर्गावर मात करण्यासाठी लसीकरण गरजेचे - पालकमंत्री हसन मुश्रीफ

संगमनेर Live
0
पालकमंत्र्यांचे नागरिकांना लसीचे दोन्ही डोस घेण्याचे आवाहन.
 
संगमनेर Live (अहमदनगर, जिमाका वृत्तसेवा) | अहमदनगर जिल्हयात कोरोना रुग्णांची संख्या कमी असली तरी अजून कोरोना धोका कमी झालेला नाही. पुढील काळात तीसऱ्या लाटेचा, ओमायक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्हयातील नागरिकांनी लसीकरण करुन घ्यावे. असे आवाहन राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोना ओमायक्रॉनबाबत उपाययोजना व लसीकरण आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मनपा आयुक्त शंकर गोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे, प्रभारी जिल्हा शल्यचिकित्सक, प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी रामटेके, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित आदी अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला अधिक गती देण्याची गरज असून त्यासाठी प्रशासनाने नागरिकांच्या घरोघरी जावून लसीकरण मोहिम पूर्ण करावी. कोरोनाच्या तपासणीमध्ये जिल्हा राज्यात सर्वात पुढे असून रोज पाच हजार पेक्षा चाचण्या जिल्हयात होत असून नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. असे त्यांनी सांगितले.

संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता जिल्हयात औषध साठा, बेडची संख्या, ऑक्सिजनची उपलब्धता याबाबतचे नियोजन प्रशासनाने करावे अशा सुचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्हयात आज पर्यंत ओमायक्रॉन व्हेरीयंटचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. जिल्हयात आत पर्यंत ३०८ नागरिक हे परदेशातून आले असून सर्वांची तपासणी करण्यात आली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जिल्हयात ९७. ९० टक्के एवढे असून मृत्यूदर १.९९ टक्के इतका आहे. सध्या जिल्हयात ३८४ सक्रिय रुग्ण आहेत. 

जिल्हयात आता पर्यंत ९ लाख नागरिकांनी कोवीड लसीचा पहिला डोस घेतला असून त्यापैकी ५ लाख नागरिकांचा दुसरा डोस घेणे बाकी आहे. ज्यांचा दुसरा डोस बाकी आहे अशा लोकांचा प्रशासनाने शोध घेवून त्यांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. तसेच जिल्हयात आता पर्यंत ज्यांचे लसीकरण बाकी आहे त्यांनी लसीचे दोन्ही डोस घेवून प्रशासनास सहकार्य करावे. यासाठी आरोग्य विभागाने लसीकरणाची विशेष मोहिम राबवून नागरिकांचे लसीकरण पूर्ण करुन घ्यावे. अशा सूचना त्यांनी आरोग्य यंत्रणेला दिल्या.

कोरोना मुळे मृत्यू झालेल्या नागरिकांच्या वारसांना आर्थिक मदत म्हणून ५० हजार रुपये दिले जातात आता पर्यत जिल्हयात १६२ कोरोना मृतांच्या वारसांना मदत दिली गेली आहे. उर्वरित मृतांच्या वारसांना मदत लवकर कशी मिळेल यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावेत. अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !