◻ प्रवरानगर येथे राज्यातील पहिली सहकार परिषद व शेतकरी मेळावा संपन्न.
संगमनेर Live | पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या सबका साथ सबका विकास या मंत्रातच सहकाराचा विचार अंतर्भूत झाला आहे. या चळवळीतील दोष दुर करुन, या चळवळीला अधिक मजबुत करण्यासाठी केंद्र सरकार पाऊल टाकत आहे. आम्ही सहकार मोडायला आलो नाहीत तर जोडायला आलो आहोत. राजकारणाच्या पलिकडे जावून या चळवळीकडे पाहा, उगाच आम्हाला सल्ले देण्यापेक्षा सहकार चळवळीचे प्रश्न राज्यातच सोडवा असा सल्ला केंद्रीय सहकार मंत्री ना. अमित शाह यांनी दिला.
केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवरानगर येथे राज्यातील पहिल्या सहकार परिषदेचे आणि शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेस केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे, मंत्री, डॉ. भागवत कराड, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, राज्य सहकारी बॅकेचे चेअरमन विद्याधर अनास्कर, परिषदेचे निमंत्रक आ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री मधुकरराव पिचड, हर्षवर्धन पाटील, राम शिंदे, आ. गिरीष महाजन, आ. देवयानी फरांदे, आ. सिमा हीरे, आ. डॉ. राहुल आहेर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. प्रशांत बंब, आ. रणजीतसिंह मोहीते, खा. डॉ. सुजय विखे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, राजेंद्र गोंदकर, महेंद्र गंधे आदि उपस्थित होते.
या परिषदेच्या निमित्ताने जिल्ह्यातील पद्मश्री पुरस्कार प्राप्त पोपटराव पवार, श्रीमती राहीबाई पोपेरे यांचा गौरव तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य जीवन गौरव पुरस्कार प्राप्त डॉ. रमेश धोंडगे यांचा मंत्री अमिती शाह यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रवरा परिवारआणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने अमित शाह यांच्यासह सर्व मान्यवरांना बैलगाडीची प्रतिकृती देवून सन्मानित करण्यात आले.
परिषदेत मार्गदर्शन करताना मंत्री अमित शाह यांनी राज्य सरकारचा नामोल्लेख न करता शालजोडे लगावले. १०० वर्षाची परंपरा असलेल्या या सहकार चळवळीला अजुन १०० वर्षे मजबुतीने पुढे न्यायचे असेल तर, या चळवळीतील दोष दुर करुन, पुढे जावे लागणार आहे. काही वर्षापुर्वी राज्यातील सहकार हा देशासाठी एक आयडीयल मॉडेल म्हणून चर्चेत होता. जिल्हा सहकारी बॅकाची नावही देशभर घेतली जायची, मात्र आज सहकारी साखर कारखानदारीसह जिल्हा सहकारी बॅकाची परिस्थिती पाहीली तर, या सहकारी संस्थांमध्ये वाढलेली बजबजपुरीच कारणीभूत असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.
सहकार चळवळीच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना अमित शाह म्हणाले की, या चळवळीत काम करताना कोणी काय केले, याबद्दल दोषारोप करण्यात आता आम्हाला रस नाही. या चळवळीच्या भविष्यासाठी काय करता येईल हा विचार करुन, आम्ही पुढे जात आहोत. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न होत असताना प्रधानमंत्र्यांनी सहकार मंत्रालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. केंद्रामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकारने पुढाकार घेतल्यामुळेच हा ऐतिहासिक निर्णय होवू शकला. या सहकारीकरणाच्या मजबुतीकरणासाठी केंद्र सरकार निश्चित असे धोरण घेवून, रात्रंदिवस काम करेल असेही त्यांनी आश्वासीत केले.
राज्यातील सहकारी संस्थाच्या प्रश्नांची चर्चा येथेच व्हायला पाहीजे परंतू याबाबतीत दिल्लीमध्ये विचार करावा लागतो. याची खंत व्यक्त करुन, मंत्री अमित शाह म्हणाले की, सहकारी साखर कारखानदारीचे खासगीकरण करणारेच सहकारासाठी सल्ले देतात, मात्र आम्हाला सल्ले देण्यापेक्षा तुमच्या येथे काय चालले आहे ते पाहा असा खोचक टोला त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला. राज्यातील सहकार मी जोडायला आलो आहे, तोडायला नाही असा स्पष्ट इशारा देवून, त्यांनी सांगितले की, सहकारी साखर कारखान्यांबरोबरच सहकारी बॅकाच्या संदर्भातील प्रश्नांसाठी केंद्र सरकार निश्चितच मदत करेल असे त्यांनी आश्वासित केले.
परिषदेचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते ना. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सहकार चळवळीला भारतीय जनता पक्षानेच खऱ्याअर्थाने पाठबळ दिले, केंद्रात मोदीजींच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यानंतर प्रथम ऊसासाठी एफआरपीचा दर निश्चित केल्यामुळे एक हजार कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. साखरेची किंमत ठरविली गेली, इथेनॉलचे निश्चिचत असे धोरण ठरविले गेल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत होईल असे स्पष्ट करतानाच साखर कारखान्यांना आयकराच्या नोटीसांचा विषय ३० वर्षापासुन प्रलंबित होता.
देशात सहकार मंत्रालय निर्माण झाल्यानंतर तो प्रश्न सुटल्यामुळे मंत्री अमित शाह यांच्या सहकार्याने राज्यातील सहकारी साखर कारखान्यांचा ८ हजार कोटी रुपयांचा फायदा झाला. हा पैसा शेतकऱ्यांनाच मिळाला याचे समाधान आहे. राज्यात युती सरकार असताना केंद्र सरकारच्या मदतीने कारखान्यांना २ हजार कोटी रुपयांचे पॅकेज दिले. आत्तापर्यंत रिझर्व्ह बॅक कधीही सहकारी बॅकांना सहकार्य करीत नव्हती आता मात्र सहकारी बॅंकाच्या पाठीशी आता अमित शाह उभे असल्याने आरबीआयलाही आता आपले धोरण बदलावे लागेल असे त्यांनी सांगितले.
या परिषदेत सहकारी साखर कारखान्यांच्या प्रश्ना संदर्भात राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर आणि सहकारी बॅकाच्या संदर्भात राज्य सहकारी बॅकेचे चेअरमन विद्याधर अनास्कर यांनी प्रश्न मांडले. परिषदेचे निमंत्रक आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वांचे स्वागत करतानाच सहकारी चळवळी समोरील प्रश्न उपस्थित करुन मंत्री अमित शाह यांचे लक्ष वेधले. या परिषदेस जिल्ह्यासह राज्यातील सहकार चळवळीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.