संगमनेर Live | संगमनेर तालुक्यात मागील दोन दिवसापासून सुरु असलेल्या भिज पावसात गारठल्याने शिबलापूर, नादूंर खंदारमाळ, आंबी दुमाला, अकलापूर, कौठेमलकापूर, सावरगावतळ येथे अनेक शेळ्या व मेंढ्याचा दुर्देवी मृत्यू झाला असून यामुळे मेंढपाळासह शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
मागील दोन दिवसापासून तालुक्यात पडत असलेल्या भिज पावसामुळे स्थानिक नागरीकाचे जीवनमान विस्कळीत झाल्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. सतधार पडणाऱ्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने थंडी वाढली आहे. त्याची झळ नागरीकासह शेतकऱ्याच्या जनावरे तसेच पशु पक्षानाही बसत आहे. पारनेर तालुक्यातील वनकुटे येथील बाळू चिंधू तांबे हे मेंढ्या चारण्यासाठी म्हणून शिबलापूर परिसरात वास्तव्यास आहेत.
बुधवारी अचानक आलेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाल्यामुळे तांबे यांच्या ५ मेंढया दगावल्याने अंदाजे ५० हजार रुपये आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच शिबलापूर येथिल अमीन सलीम शेख यांच्या एका शेळीला गारव्याचा तडखा बसल्याने ८ हजार रुपये किंमतीची शेळी दगावली आहे. दरम्यान या घटनेची माहीती कळताचं गुरुवारी सकाळी शिबलापूरचे उपसंरपच दिलीप तबाजी मुन्तोडे, कामगार तलाठी आव्हाड, ग्रामसेवक चांडे, सुरेश ब्रोंद्रे, राजेद्र पाचरणे आदिनी घटनास्थळी जावून घटनेचा पंचनामा करत शेतकऱ्याला धिर दिला असून मेंढपाळ बाळू तांबे व अमीन शेख यांचे नुकसान झाल्यामुळे आर्थिक साहाय्य देण्याची मागणी परिसरातील नागरीकानी केली आहे.
खंदारमाळ शिवारातील संतू रेवजी सोडनर, संदीप शंकर जांभूळकर, संजय लहानू झिटे (सर्व रा. मांडवे बुद्रुक) हे मेंढ्या चारण्यासाठी आले होते. सततधार पावसामुळे निर्माण झालेल्या कडाक्याच्या थंडीत त्याच्या अनेक मेंढ्या व कोकराचा गारठ्याने मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
याचबरोबर नांदूर, आंबीदुमाला, अकलापूर आदी गावांमधील शिवारात परिसरात मेंढपाळ मेंढ्या चारण्यासाठी आलेले आहेत. त्यांच्याही काही मेंढ्यांचा अवकाळी पावसाने बळी घेतला आहे. यामध्ये जानकू यमा कुलाळ (रा. जांबुत बुद्रुक) यांच्या ६ मेंढ्या, पोपट लहानू खेमनर यांची १ मेंढी, कोंडाजी राघू खेमनर यांच्या ३ मेंढ्या व १ कोकरू, दत्तात्रय भाऊसाहेब मोरे यांच्या ४ मेंढ्या, वसंत लक्षण सानप यांची १ मेंढी, पोपट गंगाराम कुदनर यांच्या ५ मेंढ्या, मारुती हरी कुलाळ यांच्या ३ मेंढ्या, अण्णा विठ्ठल काळे यांच्या ५ मेंढ्यांसह कोकरांचा मृत्यू झाला आहे.
गुरुवारी सकाळी या घटनेची माहिती समजताच नांदूर खंदरमाळ येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भास्कर कुताळ, कामगार तलाठी युवराज जारवाल, गणेश सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. यामध्ये मेंढपाळांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याने शासनाने त्यांना भरपाई द्यावी, अशी मागणी मेंढपाळांनी केली आहे.
तसेच सावरगावतळ येथेही भाऊसाहेब किसन नलावडे यांची १ मेंढी, गोरख भाऊसाहेब गडकर यांच्या २ मेंढ्या, संदीप नामदेव गुळवे यांची १ शेळी अशा एकूण ३ शेतकऱ्यांच्या एकूण ३ मेंढ्या व १ शेळी मृत झाल्या आहेत. आवकाळी पावसाने मेंढपाळासह शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान केल्याने शासनाने त्याना अर्थिक भरपाई द्यावी अशी मागणी नागरीकानी केली आहे.