◻ वाढदिवसानिमित्त फॉर्महाऊसवर गेला होता सलमान खान.
संगमनेर Live | बॉलिवूड अभिनेता सलमान खान याला साप चावल्याची घटना घडली आहे. सलमानच्या पनवेलवरील फार्महाऊसवर ही घटना घडली आहे. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तो पनवेलच्या फार्महाऊसवर गेला असताना ही घटना घडल्याचे समोर आले आहे. सध्या सलमान हा त्याच्या फार्महाऊसवर विश्रांती घेत असल्याचे माहिती समोर आली आहे.
एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खानचा उद्या वाढदिवस आहे. या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी तो पनवेलच्या फार्महाऊसवर गेला होता. याच फार्महाऊसवर सलमानला सर्पदंश झाला आहे. काल रात्री २ ते ३ च्यावेळी ही घटना घडल्याचे बोललं जात आहे. त्यानंतर त्याच्यावर कामोठेजवळील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारानंतर सलमान हा घरी परतला आहे. हा साप विषारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. सलमानला डिस्चार्ज मिळाल्यानंतर तो पुन्हा त्या फार्महाऊसवर परतला आहे.
दरम्यान सलमानचे हे फॉर्महाऊस पनवेलमधील ग्रामीण भागात आहे. माथेरानच्या डोंगर रांगामधील नेरे या ठिकाणी त्याचे फॉर्महाऊस आहे. सलमान हा अनेकदा त्या ठिकाणी जातो. तो त्या ठिकाणी शेती करताना, ट्रॅक्टर चालवतानाचे अनेक फोटो व्हिडीओ व्हायरल झाले होते. सलमानचा उद्या वाढदिवस आहे. त्यातच ख्रिसमसची सुट्टी हे निमित्त साधून त्या फॉर्महाऊसवर राहण्यासाठी गेला होता. यावेळी रात्री तो जंगलात फिरत असताना त्याच्या पायाला साप चावल्याची घटना घडल्याचे समोर आले आहे. मात्र याबाबत प्रचंड गुप्तता पाळली जात आहे.
यानंतर रात्री ३ वाजता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र हा साप बिनविषारी असल्याचे सलमानच्या जीवावर बेतलेले नाही. तो सध्या त्याच्या फॉर्महाऊसवर विश्रांती घेत असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.