◻ संगमनेर येथे कोरोना आढावा बैठक ; लसीकरणावर जास्तीत जास्त भर देण्याच्या प्रशासनाला सूचना.
संगमनेर Live | काँग्रेसचे वरिष्ठ नेते व राज्याचे महसूल मंत्री यांना कोरोनाचे सौम्य लक्षणे दिसताच त्यांनी तातडीने उपचार करून घेतले. कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर संगमनेरात येताच कोरोना उपाय योजनांबाबत आढावा बैठक घेतली असून नागरिकांनी गर्दी टाळावी. शासनाचे नियम पाळावे, तसेच काही लक्षणे आढळल्यास तातडीने उपचार घ्यावे असे आवाहन राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज येथे कोरोना उपाययोजना बाबतची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी नगराध्यक्ष सौ.दुर्गाताई तांबे, सभापती सौ सुनंदाताई जोर्वेकर, जि.प सभापती सौ.मीराताई शेटे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आर. आर. पाटील, डॉ. संदीप कचोरीया, डॉ. राजकुमार जराड, डॉ. सुरेश घोलप, श्रीनिवास पगडाल, अमृतवाहिनी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ व्यंकटेश, महेश वावळ आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना ना. थोरात म्हणाले की, कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका आहे. या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कोणीही निष्काळजीपणा करू नका. काही लक्षणे असली तर तातडीने उपचार करून घ्या. ओमायक्रॉनचा धोका मोठा आहे. ओमायक्रोन मुळे खोकला व सर्दी होऊ शकते ही सौम्य दिसणारी लक्षणे असली तरी त्यातून मोठा धोका होऊ शकतो. म्हणून वेळीच काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. संगमनेर तालुक्यात पहिल्या टप्प्यात ८६ टक्के लसीकरण झाले असून तरुणांसह लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावे. कोरोना बाबत सर्व पदाधिकाऱ्यांनी आपापल्या विभागात, प्रभागांमध्ये जागृती करा. कोरोणा बाबत कोणीही संभ्रमात राहू नका. तो अदृश्य शत्रू असून कोणालाही होऊ शकतो असे सांगताना कोरोना बाबाच्या विविध उपाय योजनांचा आढावा त्यांनी घेतला.
सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, शहरांमध्ये लसीकरणाचा वेग चांगला आहे. तरुणांनी लसीकरण करून घ्यावे. गर्दी टाळावी. घरोघरी होणारे लग्न समारंभ, उत्सव काही काळ कमी केले पाहिजे. भावनेपेक्षा वस्तुस्थितीला प्राधान्य द्यावे असेही त्या म्हणाल्या.
प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी पहिल्या डोसचे ८६ टक्के लसीकरण झाले असून दुसऱ्या डोस चे ५१ टक्के लसीकरण झाले आहे. उर्वरित लसीकरण लवकरात लवकर करण्याचे नियोजन केली असून गर्दीच्या ठिकाणी शासनाच्या नियमानुसार प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले यावेळी विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते.
अधिवेशन काळात अनेक मंत्र्यांसह आमदारांनाही कोरोना ची लागण झाली. मला काही सौम्य लक्षणे दिसतात मी तातडीने कोरोना चाचणी करून घेतली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार करून विलीनीकरणात राहिल्यानंतर आता कोरोणाचा अहवाल निगेटिव्ह आला असल्याचे नामदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.