◻ विहीरी बुजविण्याचा वाद थेट गावचं भुईसपाट करण्यापर्यत गेला
संगमनेर Live (सीताराम चांडे) | आता परत घर कसे बांधायचे, प्रंपच कसा उभा करायचा धोंडेवाडीच्या अतिक्रमण काढलेल्या ग्रामस्थांची अवस्था धोंडेवाडीत अंतर्गतवादाने गावाचे गावपण हरपले. आता गजबजाट संपला, ना माणसांचा आवाज येणार ना जनावरांचे हंबरणे एकु येणार. पन्नास साठ वर्षापासुन राहत असलेले घरे अगदी पत्यासारखी कोसळतांना पहावी लागली. घरे पडतांनाचे दुख आणि नविन घर उभारण्याचे काळजी, मुलांचे शिक्षण, लग्न कसे करणार यासारख्या अनेक प्रश्नाचे काहुर घरकारभाऱ्याच्या मनात आहे. ही परिस्थिती आहे कोपरगाव तालुक्यातील धोंडेवाडी येथील अतिक्रमण काढलेल्या गावकऱ्यांची.
विहीरी बुजविण्यापासुन वादाला सुरुवात होऊन गायरान जमीनीवर वसलेले गाव उठविण्यापर्यंत हा वाद गेला. आणी अखेर प्रशासनास कार्यवाही करणे भाग पडले. यातुन सुमारे तिन दशके गाव मागे गेले असे म्हणावे लागेल. न्यायालयाच्या आदेशाने गायरान जमीनीवरील घरे, टपऱ्या, दुकाने प्रशासनाने काढले. त्यामुळे अनेकांचे मोठे हाल झाले. अंतर्गत असलेल्या वादाने धोंडेवाडी गाव होत्याचे नव्हते झाले. दोन चार जणामधील वाद निम्याहुन अधिक गावाला भोवला.
धोंडेवाडी येथे सहा गावांच्या पिण्याच्या पाण्याचा साठवण तलाव आहे. त्याच्या परीसरात शेतकऱ्यांच्या विहीरी होत्या. त्या संदर्भात गावातील काहीनी शासकिय जमीनीत विहीरी असुन त्यातुन पाणीउपसा होतो अशी तक्रार प्रशासनाकडे केली. सुरुवातीला प्रशासनाने दुर्लक्ष केले. मात्र सातत्याने पाठपुरावा होत असल्याने १४ नोव्हेंबर २०१७ रोजी २७ विहीरी व ३ बोअरवेल प्रशासनास बुजवाव्या लागल्या.
यातुन अंतर्गत वादाला सुरुवात झाली. त्यामुळे एकाने गायरान जमीनीवर ग्रामस्थ राहत असल्याची तक्रार न्यायालयात केली. दावा औरंगाबादच्या हायकोर्टात गेला तिथे अतिक्रमण काढण्याचा आदेश निघाला त्यास त्या जागेवर राहत असलेल्या शेतकऱ्यांनी सर्वोच्च न्यायालयात आवाहन दिले पंरतु, तिथे याचीका फेटाळली अन प्रशासनास अतिक्रमण काढण्याचा आदेश आला.
बहुतांश लोकांनी स्वंता: हुन अतिक्रमण काढले. परंतु रहायचे कुठे हा प्रश्न त्यांच्या पुढे पडला. काहींनी शेजारी असरा घेतला तर काहींनी पाहुण्यांकडे तर काहींनी शेतात राहोटी ठोकली. प्रशासन व इतर जण काहीतरी मार्ग काढतील या आशेवर या ठिकाणी राहणाऱ्यांची होती. त्यामुळे अनेकजण बिनधास्त होते. पण काहीच मार्ग निघाला नाही अन विहीरी बुजविण्यापासुन सुरु झालेला वाद ७ जानेवारी २०२२ रोजी घरे उठविण्यापर्यत गेला.
धोंडेवाडी हे दुष्काळी टापुतील गाव सातत्याने पिण्याच्या पाण्याचीही टंचाई. चांगला पाऊस झाला तर खरीपाची पिके येतात. रब्बीचे प्रमाण नसल्यातच जमा. काबाडकष्ट करुण रहायला निवारा केला. गावाला गावठाणात जागा कमी असल्याने शेजारीच असलेल्या जागेत गावकरी रहात गेले. पन्नास साठ वर्षे झाले येथे रहायला, आता अचानक तेथुन उठावे लागले याचे मोठे दु:ख या ग्रामस्थांना झाले.
यातुन बाहेर यायला या लोकांना मोठा काळ लागणार आहे. घरे पडताना पाहतांना राहणाऱ्यांना तर रडु येणे साहजीक होते, पण शेजारच्या परीसरातील गावातील नागरीकांच्या डोळ्यांनाही अश्रु आल्यावाचुन राहीले नाही. संपुर्ण सोशल मिडीयात दुख झाल्याचे स्टेटस पहायला मिळत होते. प्रशासनाने न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले.
गावठाणाच्या हद्दी या कमी झाल्या आहेत. त्यामुळे गावठान हद्द वाढवून ज्याप्रमाणे मोठ्या शहरामध्ये झोपडपट्टींचे झोपु योजनेअंतर्गत पुनर्वसन केले. त्याप्रमाणे शासनाने ग्रामीण भागातही धोरणात्मक निर्णय घेतला पाहीजे. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विशेष घरकुल योजना करून सर्वांचे पुर्नवसन केले पाहिजे. अशी भुमिका प्रदिप दरेकर यानी मांडली आहे.
एक- एक वीट जोडून संसार उभा केला होता. मात्र पत्त्याचं घर ज्या प्रमाणे सहज कोसळून पडते, त्या प्रमाणे आमचा सोन्याचा संसार कोसळून पडला आहे. राजाने मारले अन नियतीने झोडपले तर दाद कोणाकडे कुणाकडे मागायची अशी अवस्था आमची झाल्याचे सौ. अर्चना पाडेकर यानी म्हटले आहे.
आमच्यावर एवढा अन्याय होईल असे वाटले नव्हते. घरे पडल्याने अजुनही आमचा प्रपंच उघड्यावर पडुन आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये. अशी आर्त विनवणी गणेश नेहे यानी केली.
घर कसे बांधायचे.? त्यासाठी पैसे कोठुन आणणार.? कसे जगणार.?जमीन नाही.? कायमस्वरुपी उत्पनाचे साधन नाही आता काय करायचे असा प्रश्न उभा राहिल्याचे सागर भालेराव यानी सांगितले.