◻ दिलीप सोमनाथ आंधळे थोडक्यात बचावले.
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारात बुधवारी सकाळी मादी बिबट्याने येथिल शेतकरी दिलीप सोमनाथ आंधळे याच्यावर हल्ला करत जखमी केल्याची घटना घडली असून आंधळे या हल्ल्यातून थोडक्यात बचावले आहे. मागील काही दिवसापासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना वाढत आसल्याने वनविभागाने त्वरीत या ठिकाणी पिजंरा लावून या बिबट्याचा बदोंबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, बुधवारी सकाळी दिलीप आंधळे हे आपल्या दुचाकीवरून निमगावजाळी रस्त्याने मळ्याकडे चालले होते. यावेळी गट नं १०४ लगतहून जात असताना बिबट्याची पिल्ले त्याच्या नजरेस पडली. क्षणार्धात ऊसाच्या शेतातून बाहेर येत बेसावध असलेल्या आंधळे याच्यावर मादी बिबट्याने पाठीमागून हल्ला केला.
त्यामुळे त्यांच्या डाव्या डोळ्याखाली, पाठीवर व हाताच्या पंज्याच्या जागी बिबट्या मादीच्या नख्या व दात लागल्यामुळे ते जखमी झाले. यामुळे आंधळे हे दुचाकीवर खाली कोसळले. या आवाजामुळे बिबट्याची पिल्ले घाबरली व सैरावर पळत सुटल्याने मादी बिबट्याही पिल्लाच्या दिशेने निघुन गेल्याने आंधळे हे थोडक्यात बचावले आहेत.
दरम्यान यावेळी आंधळे यांनी याबाबतची माहिती ग्रामपचायत व ग्रामस्थाना दिली. यापुर्वी ग्रामपचायतीने वनविभागास परिसरात पिंजरा लावण्याची मागणी करत पत्र दिले होते. मात्र अद्याप वनविभागाकडून कुठलीचं कारवाई झालेली नाही. बिबट्याकडून परिसरात सतत होणाऱ्या हल्ल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.