◻ आश्वी बुद्रुक बाजारतळावर सैनिक सन्मान सोहळ्याचे आयोजन
◻ इंदुरीकर महाराजासह प्रशासनातील दिग्गज आधिकारी राहणार उपस्थित
संगमनेर Live | अखंड महाराष्ट्राचे अराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३९२ वा जयंती उत्सव सोहळा संगमनेर तालुक्यातील शिव प्रतिष्ठान (आश्वी व पंचक्रोशी) वतीने शनिवार दि. १९ फेब्रुवारी रोजी अनोख्या पद्धतीने साजरा केला जाणार आहे. यावेळी शिवप्रतिमेचे पुजन, शिवज्योत मानवंदना तसेच भारतीय सैन्यदलातील आजी माजी सैनिकाचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती शिव प्रतिष्ठानने दिली आहे.
यावेळी ओझर, उंबरी बाळापूर, आश्वी बुद्रुक, आश्वी खुर्द, झरेकाठी व निमगावजाळी येथिल शिवरायाचे मावळे छत्रपतीचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी येथुन विधीवत शिवज्योत आणणार असून ढोल ताशांच्या गजरात पंचक्रोशीतून शिवभक्त याप्रसंगी रयतेच्या राजाला मानवंदना देणार आहेत. आश्वी बुद्रुक येथिल बाजारतळावर शनिवारी सकाळी ११ वा मुख्य सोहळा होणार आहे.
शिवजयंती म्हणजे मुख्य सोहळा दिनी सकाळी शिवप्रतिमेचे पुजन केले जाणार असून यावेळी समाज प्रबोधनकार हभंप निवृत्ती महाराज देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, प्रांत अधिकारी डॉ. शशिकांत मगरुळे, जिल्हा गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, आश्वीचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये, शिव व्याख्याते दिपक कर्पे याच्या प्रमुख उपस्थित भारतीय लष्करी सेवेतील यशस्वी कामगिरी बजावलेल्या आश्वी पंचक्रोशीतील आजी माजी सैनिकाचा सन्मान सोहळा संपन्न होणार आहे.
दरम्यान किल्ले शिवनेरी येथुन शिवज्योत आणण्याचे हे पाचवे वर्ष असल्याची माहिती शिव प्रतिष्ठानकडून देण्यात आली आहे.