◻ माजी मंत्री आ. राधकृष्ण विखे पाटील यांची माहिती
◻ केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांना बळकटी
संगमनेर Live | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सुरु केलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत शिर्डी विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या संगमनेर तालुक्यातील १२ गावांच्या पाणी पुरवठा योजनांसाठी ४८ कोटी १७ लाख रुपयांचा निधी मंजूर असल्याची माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
ग्रामीण भागातील प्रत्येक कुटूंबाला नळाद्वारे पाणी मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारने जलजीवन मिशन योजनेचा मोठा कार्यक्रम सुरु केला आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील पाणी पुरवठा योजनांना बळकटी देण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. प्रतिदीन एका व्यक्तिला ५५ लिटर पाणी मिळावे, याकरीता प्रत्येक गावात नवीन पाणीपुरवठा योजना सुरु करणे अथवा जुन्या पाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीकरीता राज्यसरकारच्या भागीदारीसह निधीची उपलब्धता करुन देण्यात आली आहे.
शिर्डी विधानसभा मतदार संघात समाविष्ट असलेल्या संगमनेर तालुक्यातील आश्वी व जोर्वे गटातील बारा गावांच्या पाणी योजनांचा प्रस्ताव जलजीवन मिशन अंतर्गत सादर करण्यात आला होता. यासर्व योजनांच्या प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळाल्यामुळे निधी उपलब्ध होण्याचा मार्गही मोकळा झाला असल्याची माहिती आमदार विखे पाटील यांनी दिली.
यामध्ये खळी (२२.५५ लाख रु.), झरेकाठी (१३.९३ लाख रु.), शेडगाव (२०.०१ लाख रु.), शिबलापूर (२१.०८ लाख रु.), चणेगाव (१ कोटी ७४ लाख रु.), मनोली (१ कोटी ९८ लाख रु.), उंबरी बाळापूर (२ कोटी ७५ लाख रु.), जोर्वे (४ कोटी ९८ लाख रु.), ओझर बुद्रुक (१ कोटी ५२ लाख रु.), हंगेवाडी (१ कोटी ९ लाख रु.), ओझर खुर्द (७८ लाख रु.), कोल्हेवाडी (२७ कोटी ६३ लाख रु.) या पद्धतीने या गावाच्या पाणी योजनांसाठी निधीची उपलब्धता होणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.
संगमनेर तालुक्यातील गावांचा समावेश शिर्डी विधानसभा मतदार संघात झाल्यानंतर या गावातील सर्व पायाभूत सुविधांसाठी शासन योजनांतून निधीची उपलब्धता करुन देण्याचा प्रयत्न आपला सातत्याने सुरु आहे. केंद्र सरकारसह राज्यसरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी मतदार संघात सुरु असून, या गावांचा पाणी प्रश्न कायम स्वरुपी सोडविण्यासाठी केंद्र सरकारच्या जलजीवन मिशन योजनेचा लाभही गावांना मिळावा, या दृष्टीने केलेल्या प्रयत्नांना निधी उपलब्धतेमुळे मोठा दिलासा मिळाला असल्याचे विखे पाटील म्हणाले.
दरम्यान ग्रामीण भागातील पाणी पुरवठ्याच्या योजनांसाठी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सुरु केलेले जलजीवन मिशन प्रत्येक कुटूंबापर्यंत स्वच्छ पाणी पोहोचविण्यासाठी यशस्वी होईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त आहे.