जिल्‍ह्यातील तीनही मंत्र्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडले - आ. विखे पाटील

संगमनेर Live
0

आश्‍वी बुद्रूक येथे २ कोटी ६७ लाख रुपयांच्‍या विविध विकास कामांचा शुभारंभ

◻आश्‍वी महाविद्यालयाला विरोध करणारे येथील विकासाची घडी मोडण्‍यासाठी आले

संगमनेर Live | महाविकास आघाडी सरकारच्‍या काळात राज्‍याची मोठी पिछेहाट झाली असून, नगर जिल्‍ह्याला तीन तीन मंत्रीपद मिळूनही संकटाच्‍या काळात कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. या सरकारच्‍या काळात शेतकरी आणि सर्वसामान्‍य माणूस देशोधडीला लागला, मराठा ओबीसी समाजाचे आरक्षणही गेले या सर्व पापाचे प्रायचित्‍त आघाडी सरकार घेणार का.? असा सवाल आ. राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केला.

संगमनेर तालुक्यातील आश्‍वी बुद्रूक येथे जिल्‍हा परिषद शाळेच्‍या नुतन इमारतीचे उद्धाटन आणि सुमारे २ कोटी ६७ लाख रुपयांच्‍या विविध विकास कामांचा शुभारंभ आ. विखे पाटील यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आला. या निमित्‍ताने आयोजित केलेल्‍या कार्यक्रमात आ. विखे पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिकेची झोड उठवून जिल्‍ह्यातील तीनही मंत्र्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडून दिले असल्‍याचा आरोप केला.

जेष्‍ठ नेते शाळीग्राम होडगर यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या कार्यक्रमास जिल्‍हा परिषदेच्‍या शिक्षण समितीचे राजेश परजणे, जिल्‍हा परिषद सदस्‍या अँड. रोहीणी निघुते, प्रवरा बॅकेचे चेअरमन अशोकराव म्‍हसे, पंचायत समिती सदस्‍य निवृत्‍ती सांगळे, सौ. दिपाली डेंगळे, विखे पाटील कारखान्‍याचे संचालक रामभाऊ भुसाळ, कैलास तांबे, विनायकराव बालोटे, भाऊ गायकवाड, भाऊसाहेब जऱ्हाड, भगवानराव इलग यांच्‍यासह पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

आपल्‍या भाषणात आ. विखे पाटील म्‍हणाले की, कोव्‍हीड संकटानंतर पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जनसामान्‍यांसाठी प्रभावी योजना राबविल्यामुळेच या देशातील जनता सुरक्षित राहीली. मोफत लसिकरण आणि मोफत धान्‍य याचा मोठा आधार सामान्‍य माणसाला केंद्र सरकारने दिला. शेतकरी, कामगार, महिला यांच्‍यासाठी विविध योजना सुरु केल्‍यामुळेच हा देश आत्‍मनिर्भरतेकडे जात असल्‍याचे त्‍यांनी आवर्जुन नमुद केले.

राज्‍य सरकारवर टिका करताना आ. विखे पाटील म्‍हणाले की, कोव्‍हीड संकटात कोणतीही मदत समाज घटकाला हे सरकार करु शकलेले नाही, सरकार फक्‍त फेसबुकवर दिसत होते. केवळ केंद्राकडे बोट दाखवून मदतीची अपेक्षा करीत राहीले. आघाडी सरकारच्‍या अडीच वर्षांच्‍या काळात राज्‍य विकासापासून मागे गेले आहे. सरकारच्‍या फक्‍त घोषणाच सुरु आहेत. एक मंत्री महिलेने आत्‍महत्‍या केली म्‍हणून घरात बसला, गृहमंत्री १०० कोटी रुपयांच्‍या वसुलीमध्‍ये जेलमध्‍ये गेले, आतातर एका मंत्र्याचे थेट दहशदवाद्यांशी आर्थिक संबध उघड झाले तरी या आघाडी सरकारला कोणतीही शरम नाही. देशद्रोही मंत्र्यांची पाठराखन करण्‍यासाठी मंत्रीच रस्‍त्‍यावर उतरायला लागले हे राज्‍याचे दुर्दैव असल्‍याचे आ. विखे पाटील म्‍हणाले.

संगमनेर तालुक्‍यातील गावांचा समावेश शिर्डी विधानसभा मतदार संघात झाल्‍यानंतर या भागामध्‍ये सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. कोव्‍हीड काळात कार्यकर्त्‍यांच्‍या सहकार्याने मदतीचे काम मोठ्या प्रमाणात केले. कोव्‍हीड संकट लक्षात घेवून मराठा ओबीसी समाजातील विद्यार्थ्‍यांची ५० टक्‍के फी माफ करण्‍याचा निर्णय प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेने घेतला. आज अनेकजण या भागात येवून फिरत आहेत, त्‍यांना हे का सुचले नाही.? या भागात रयत शिक्षण संस्‍थेचेही महाविद्यालय आहे. परंतू फक्‍त या संस्‍थेचा राजकीय वापर सुरु आहे. काहींना सध्‍या पाहुण्‍यांचा कळवळा खुप आला आहे असा टोला लगावून आ. विखे पाटील म्‍हणाले की, याभागामध्‍ये सर्व काही आम्‍हीच करतो असे भासविण्‍याचा प्रयत्‍न करीत आहेत. परंतू ही गावे शिर्डी मतदार संघात येण्‍यापुर्वी लोकांना चालायलाही रस्‍ते नव्‍हते तेव्‍हा तुम्‍ही कुठे होता असा टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे नाव न घेता लगावला.

आज वाळू माफीयांनी या भागात उच्‍छाद मांडला आहे. सत्‍तेचा उन्‍माद चांगला नसतो. विकास कामांना अडथळे आणू नका, आश्‍वी पोलिस ठाण्‍याच्‍या हद्दीतील गावे संगमनेर तालुका पोलिस ठाण्‍यात समाविष्‍ठ करुन दबाव निर्माण करण्‍याचे काम करीत आहेत. आश्‍वी येथील महाविद्यालयाला सुध्‍दा विरोध करणारे येथील विकासाची घडी मोडण्‍यासाठी आता आले आहेत अशी प्रखर टिका आ. विखे पाटील यांनी ना. बाळासाहेब थोरात याचे नाव न घेता केली.

या कार्यक्रमाचे अध्‍यक्ष शाळीग्राम होडगर यांनी आपल्‍या भाषणात राजकीय सामाजिक परिस्थितीचा आढावा घेवून बालआनंद निधी योजनेची घोषणा केली. समाजाच्‍या सहकार्याने जमा होणाऱ्या या निधीतून जिल्‍हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्‍यांना अन्‍नदान करण्‍याचा मानस त्‍यांनी व्‍यक्‍त केला. याप्रसंगी अँड. सौ. रोहीणीताई किशोर निघुते, विनायकराव बालोटे यांची भाषण झाली.

केंद्र सरकारच्‍या श्रम मंत्रालयाच्‍या वतीने बांधकाम कागारांना देण्‍यात येणाऱ्या किटचे वितरण मान्‍यवरांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले. याप्रसंगी शाळीग्राम चंद, माधवराव भोसले, विजय चतुरे, पोपटराव वाणी, अजय ब्राम्हणे, मच्छिंद्र थेटे, नारायण कहार, प्रभाकर निघुते, नानासाहेब डोईफोडे, कांचन मांढरे, जेऊरभाई शेख, शिवाजीराव इलग, सरपंच सतिश जोशी, मकरंद गुणे, रमेश गायकवाड, सतिष कानवडे, गौरव सांबरे, अशोक जऱ्हाड यांच्‍यासह पदाधिकारी आणि आधिकारी उपस्थित होते.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !