◻ युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी ना. थोरात यांच्याकडून प्रयत्न सुरु
◻ केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालय आणि राज्य सरकारशी समन्वय साधण्याला प्राधान्य
◻ अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्याची संख्या मोठी
संगमनेर Live | रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर युक्रेन या देशांमध्ये अडकलेल्या हजारो विद्यार्थ्याना पुन्हा मायदेशी आणण्यासाठी राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात हे केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालय आणि राज्य सरकारशी समन्वय साधून पाठपुरावा करत आहेत.
सध्या रशिया व युक्रेनमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असून युक्रेनमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी युक्रेन मध्ये शिकण्यासाठी गेले आहेत. त्यात विशेषतः अहमदनगर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मोठी संख्या आहे. हे विद्यार्थी तेथे अडकल्यामुळे अनेक पालक चिंतेत आहेत. याबाबत राज्याचे महसूलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क साधून या विद्यार्थ्यांना परत आणण्याकरता केंद्र सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या विशेष कक्षाकडे पाठपुरावा केला आहे.
केंद्र सरकारने या कामी विशेष कक्ष (कंट्रोल रूम) स्थापन केला असून नामदार थोरात यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतच्या सूचना केल्या आहेत. वेळोवेळी या कक्षाशी संबंधित विद्यार्थ्यांशी संपर्कात राहून या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पाठपुरावा करावा. काही अडचणी असतील तर तातडीने संपर्क करावा असे सांगितले आहे.
याबाबत राज्यभरातून आणि अहमदनगर जिल्ह्यातून अनेक पालकांनी नामदार थोरात यांच्याशी संवाद साधला असून नामदार थोरात यांनी घेतलेल्या या पुढाकारामुळे अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
यापूर्वी केदारनाथ प्रलयाच्या वेळी आणि वैष्णो देवी, जम्मू काश्मीर मध्ये झालेल्या अपघाताच्या वेळी ही नगर जिल्ह्यातील अनेक भाविकांना सुखरूप परत आणण्यासाठी नामदार बाळासाहेब थोरात यांनी मोठा पाठपुरावा केला होता. त्यामुळे पालकांनी नामदार थोरात यांच्याशी संपर्क साधला असून आमदार थोरात म्हणाले की, याबाबत महाराष्ट्र सरकार अत्यंत संवेदनशील असून विद्यार्थ्यांसाठी योग्य ती सर्व मदत केली जाईल. याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी सर्व मदत करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे ते म्हणाले.