◻ शिर्डी येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय इमारतीचे उद्घाटन
◻ गावपातळीवर वाचनालय निर्माण करण्याची गरज
संगमनेर Live (शिर्डी) | वाचन संस्कृतीचे संवर्धन करण्यासाठी वाचनालय ही गरज असली तरी बदलत्या काळानूसार ई-ग्रंथालय सुध्दा विकसीत करून मराठी भाषेची अभिरूची आपल्याला वाढवावी लागेल असे मत माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
शिर्डी नगरपरिषदेच्या वतीने विकसीत करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय इमारतीचे उद्घाटन मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आ. विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी प्रशासक गोविंद शिंदे, माजी नगराध्यक्ष शिवाजीराव गोंदकर, कैलास कोते, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, माजी उपनगराध्यक्ष सचिन कोते, तालुका ज्ञानेश्वर गोंदकर, शहर अध्यक्ष सचिन शिंदे या इमारतीस जागा देणारे विलास कोते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी आ. विखे म्हणाले की, वाचनालय चळवळीच्या माध्यमातून वाचनाची आवड निर्माण होण्यास मदत होत आहे. या चळवळीने केलेल्या प्रयत्नामुळे मराठीसह इतर साहीत्य सहज उपलब्ध होते. मराठी साहीत्यात असलेल्या वेगवेगळ्या अभिरूची जपताना लेखकांनी काळानूसार केलेले लिखाण मराठी भाषेची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
तंत्रज्ञान बदलत आहे, प्रत्येकजण सोशल मिडीयाचा उपयोग करून जगाबरोबर राहण्यासाठी धडपड करतो. परंतू याच कारणाने वाचन संस्कृती लोप पावत चालल्याची खंत व्यक्त करून वाचनाची आवड वृध्दीगंत करण्यासाठी गावपातळीवर आशा वाचनालय निर्माण करण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त करतानाच वाचनालय चळवळीचे मोठे काम सूरू आहे. परंतू आता ई-ग्रंथालय निर्माण होणे ही आवश्यकता असल्याचे स्पष्ट करुन, नव्याने विकसीत झालेल्या या इमारतीत अभ्यासिकेबरोबरच स्पर्धा परिक्षांसाठी ऑनलाईन वर्ग सुरु करण्याचेही त्यांनी सुचित केले.
दरम्यान यावेळी प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांनी आ. विखे पाटील यांचा सत्कार केला. कार्यक्रमास परिसरातील नागरीकांसह सर्व आजीमाजी नगरसेवक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.