श्रमिकांच्या आत्महत्यांना जबाबदार मोदी सरकारला जनता खाली खेचेल - कॉम्रेड उदय नारकर

संगमनेर Live
0
माकपचे ७ वे अहमदनगर जिल्हा अधिवेशन अकोलेत संपन्न.

◻कॉ. सदाशिव साबळे यांची जिल्हा सचिवपदी निवड

संगमनेर Live (अकोले) | देशभरातील शेतकरी, कामगार व गरीब श्रमिकांच्या समस्या मोदी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. महागाई, बेरोजगारी, कर्जबाजारीपणा सातत्याने वाढतो आहे. शेतकरी, शेतमजूर, बेरोजगार तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत. भारतीय श्रमिकांच्या आत्महत्यांना जबाबदार असलेल्या मोदी सरकारला सत्तेवरून जनता नक्कीच खाली खेचेल असे प्रतिपादन माकपचे राज्य सचिव मंडळ सदस्य नेते कॉम्रेड उदय नारकर यांनी केले. 

माकपने अहमदनगर जिल्ह्यात सातत्याने श्रमिकांचे अत्यंत झुंझार लढे लढले आहेत. अकोले तालुक्यात मागील विधानसभेत झालेल्या सत्तांतरातही पक्षाने महत्वाची भूमिका निभावली आहे. येत्या पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही  माकप महत्वाची भूमिका बजावेल. अकोलेत पक्ष चार पंचायत समिती व एक जिल्हा परिषदेची जागा लढवेल व जिंकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. माकपच्या ७ व्या जिल्हा अधिवेशनात ते बोलत होते.

नरेंद्र मोदी सरकारने सातत्याने भांडवलदार व कॉर्पोरेट कंपन्यांची तळी उचलली. शेतकरी व श्रमिकांचे जीवन मात्र अत्यंत बत्तर केले. शेतकऱ्यांनी वर्षभर दिल्लीच्या सिमेवर मोदी सरकारच्या या श्रमिक विरोधी धोरणांचा कडवा प्रतिकार केला. येत्या काळातही शेतकरी, कामगार, शेतमजूर श्रमिक मोदी सरकारच्या या धोरणांचा कडवा प्रतिकार  करतील व मोदी सरकारला सत्तेतून बाहेर घालवतील असा विश्वास प्रा. उदय नारकर यांनी व्यक्त केला.

अधिवेशनामध्ये पक्षाच्या कामगिरीचा धोरणात्मक, संघटनातत्मक व कार्यात्मक अहवाल कॉ. सदाशिव साबळे यांनी मांडला. अधिवेशन प्रतिनिधी म्हणून निवडून आलेल्या प्रतिनिधींनी अहवालावर सविस्तर चर्चा केली. अधिवेशनाने एकमताने अहवाल स्वीकारला. पक्षाची आगामी कार्याची दिशाही यावेळी निश्चित करण्यात आली. 

जिल्हा अधिवेशनामध्ये १८ जणांची जिल्हा कार्यकारिणी निवडण्यात आली. कॉम्रेड सदाशिव साबळे यांची पक्षाचे जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली. सात जणांचे सचिव मंडळ यावेळी निवडण्यात आले. डॉ अजित नवले, सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, मेहबूब सय्यद, ज्ञानेश्वर काकड व नंदू गवांदे यांची जिल्हा सचिव मंडळात निवड करण्यात आली. नागपूर येथे होणाऱ्या राज्य अधिवेशनासाठी ९ प्रतिनिधींची निवड यावेळी करण्यात आली.

पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य कॉ. किसन गुजर यांनी नवीन कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या. पक्ष नव्या कार्यकारिणीच्या नेतृत्वाखाली श्रमिकांची लढाई निर्णायक पातळीवर घेऊन जाईल व विजयी करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !