◻ महसूल मंत्री ना. थोरात यानी घेतली मंगेशकर कुटुंबीयांची भेट
◻ प्रभू कुंज निवासस्थानी जाऊन लतादीदींना आदरांजली केली अर्पण
संगमनेर Live (मुबंई) | स्वरसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांनी आपल्या दैवी सुरांमधून जगभरातील श्रोत्यांना सदैव मंत्रमुग्ध केले आहे. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्रातील अजरामर तारा निखळला असून राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी लतादीदींच्या प्रभू कुंज या निवासस्थानी जाऊन मंगेशकर कुटुंबीयांचे सांत्वन केले.
मुंबई येथिल प्रभू कुंज निवास्थानी नामदार थोरात यांनी लतादीदींना आदरांजली अर्पण केली व मंगेशकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर, आदिनाथ मंगेशकर आदी उपस्थित होते.
लतादीदींनी ९८० पेक्षा अधिक चित्रपटांमधून गाणी गायली असून २० हून अधिक प्रादेशिक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे. त्या भारतीय संगीताचे आंतरराष्ट्रीय पातळीवर नेतृत्व करत होत्या. सहा दशके संगीताच्या माध्यमातून जगभरातील श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणाऱ्या लतादीदींचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण भारत देश शोकसागरात बुडाला आहे. आज महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी लतादीदींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन अभिवादन केले.
यावेळी नामदार थोरात यांनी लतादीदींच्या आठवणी बद्दल बोलताना सांगितले की, नाशिक येथे सहकारातील व समाजकारणातील कामाबद्दल तीर्थरूप स्वर्गीय भाऊसाहेब थोरात यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठान व दिनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार दिला होता. हा सोहळा आमच्या कुटुंबीयांच्या व संगमनेर आणि सहकारातील सर्व कार्यकर्त्यांच्या जीवनात स्मरणात राहणार आहे.
मला लतादीदींना भेटायचे होते. परंतु कोरोना संकटात भेटता आले नाही. त्यामुळे लतादीदींनी स्वतः फोन करून सांगितले की बाळासाहेब कोरोनामुळे मला घराच्या बाहेर पडता येत नाही आणि घरीही कोणाला बोलावता येत नाही. कोरोना संपला की आपण नक्की भेटू, मात्र ती भेट झाली नाही. याची खंत मला कायम राहील.
लतादीदींचे कोणते गाणे तुम्हाला आवडते असा प्रश्न देशातील कोणत्याही व्यक्तीला केला तरी त्याला कमीत कमी शंभर नावे घ्यावी लागतील. संत ज्ञानेश्वरांच्या ओव्या आणि लतादीदींचा आवाज हा एक सुंदर मिलाप सर्वांसाठी मोठा अनमोल ठेवा असल्याचेही नामदार थोरात यांनी म्हटले असून मंगेशकर कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे नामदार थोरात यांनी सांगितले. यावेळी विविध आठवणींवर हृदयनाथ मंगेशकर, उषा मंगेशकर यांच्या समवेत चर्चा झाली.