संगमनेर Live (पणजी) | गोव्यातील जनता भाजपाच्या गैरकारभाराला वैतागलेली आहे. जनतेला पुन्हा काँग्रेसच हवी आहे, त्यामुळे गोव्यात काँग्रेस पूर्ण बहुमताने सरकार बनवेल आणि गोव्याच्या विकासाचे रुतलेले चाक पुन्हा गतिमान होईल असा, असा विश्वास महाराष्ट्र विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
गोव्यात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेल्या थोरात यांनी गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पत्रकार परिषदेला संबोधित केले, यावेळी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, गोवा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आदी उपस्थित होते.
यावेळी नामदार थोरात म्हणाले, गोव्याची भूमी ही काँग्रेस विचारांची, येथील जनमानसाच्या मनात काँग्रेस रुजलेली आहे. भाजपच्या फसवेगिरीचा नागरिकांना कंटाळा आलेला आहे, त्यामुळे गोव्यातील जनतेने बदल करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळेच काँग्रेसला बहुमताने सत्तेवर आणण्याचा निर्णय जनतेने केला आहे.
देशाच्या पातळीवर बोलायचे झाल्यास, माणसामाणसात भेद निर्माण करण्याचे राजकारण सुरू आहे. गोव्याची भूमी ही सर्वधर्मसमभावाची भूमी आहे. गोवा ही सर्वांना सामावून घेणारी भूमी आहे आणि त्यामुळे भाजपच्या विद्वेशाच्या राजकारणाला येथील जनता थारा देणार नाही. काल व परवा संसदेमध्ये पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर विवेचन करून पुढे काय करायचे याचे निवेदन करायला हवे होते.
मात्र दुर्दैवाने त्यांनी काँग्रेस व नेहरूजी यांचा वारंवार उल्लेख केला. काँग्रेस व पंडित नेहरू यांचे भारताच्या विकासात मोठे योगदान असून कॉंग्रेसला त्यागाची व बलिदानाची मोठी परंपरा लाभली आहे. देशाला पुढे नेणारा कॉंग्रेसचा विचार असून गोव्याची जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत म्हणाले की, भाजपचा भ्रष्टाचार वाढला असून या पक्षाची उलटी गिनती सुरू आहे. जनतेमध्ये भाजप बद्दल तीव्र रोष असून लोकांचा कौल हा या वेळी काँग्रेस पक्षाला आहे. तर अमरनाथ पंजिकर म्हणाले की, भ्रष्टाचारी लोक भाजपमध्ये गेले किती शुद्ध होतात हे नवीनच सूत्र मागील काही दिवसापासून सुरू झाले आहे.