◻ पुरस्कार कोव्हीड योध्दयांना समर्पित - आ. विखे पाटील
संगमनेर Live (लोणी) | शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल भाजप नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘जीवन साधना’ गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यापीठाच्या ७३ व्या वर्धापनदिनी जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण झाले.
आ. राधाकृष्ण विखे पाटील लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे चेअरमन आहेत. गेली अनेक वर्षे सहकार चळवळीत काम करताना सामाजिक दायित्व म्हणून त्यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेवून पुणे विद्यापीठाने आ. विखे पाटील यांना ‘जीवन साधना’ गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. कुलगुरू डॉ. नितीन करमरकर यांनी या पुरस्काराबद्दल दूरध्वनीवरून आ. विखे यांना माहीती दिली.
पुणे विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी स्थापना दिवसाचे औचित्य साधून विविध क्षेत्रातील व्यक्तींना ‘जीवन साधना’ आणि युवा पुरस्कार देवून गौरविण्यात येते. शैक्षणिक क्षेत्रात गुणात्मक कार्य करणाऱ्या संस्थाना सुध्दा दरवर्षी सन्मानित करण्यात येत असते. यंदाच्या ७३ व्या स्थापना दिवसानिमिताने पुणे येथे झालेल्या या सन्मान सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र कुलगुरू डॉ. एम. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत आ. विखे पाटील यांना ‘जीवन साधना’ गौरव पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
मानपत्र, स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. मानपत्राचे वाचन सिनेट सदस्य राजेश पांडे यांनी केले. या पुरस्कार सोहळ्यास विखे पाटील कुटूबियांसह प्रवरा परीवारातील सर्व संस्थाचे पदाधिकारी, संचालक, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी स्थापन केलेल्या आणि पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी वटवृक्ष केलेल्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून आ. विखे पाटील यांनी अनेक शैक्षणिक उपक्रम सुरू केले आहेत. याचा मोठा लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना झाला. हजारो विद्यार्थी या शैक्षणिक संकुलात शिक्षण घेत असून, दिड लाख, माजी विद्यार्थी देशात आणि परदेशात विविध क्षेत्रात यशस्वीपणे कार्यरत असून यासर्व माजी विद्यार्थ्याचे संघटन आ. विखे पाटील यांनी केले आहे.
प्रामुख्याने कोव्हीड संकटात प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यामातून पद्मश्री डॉ. विखे पाटील महाविद्यालयात सुरू करण्यात आलेल्या कोव्हीड सेंटरचा मोठा उपयोग रुग्णांना झाला. मोफत उपचार आणि सुविधा आ. विखे यांनी उपलब्ध करून दिल्याने सामान्य नागरीकांचे कोट्यावधी रुपये वाचले. मराठा आरक्षणाच्या निर्माण झालेल्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर मराठा आणि ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेने व्यावसायिक महाविद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ५० टक्के फी माफ करण्याचा निर्णय घेतला. याचाही लाभ नव्याने प्रवेश घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्याना झाला.
नगर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त २०८ शेतकरी कुटुंबियांना दतक घेवून विखे पाटील परीवाराने या शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक, आरोग्य सुविधा उपलब्ध करून देतानाच या कुटुंबातील मुलींच्या लग्नासाठी अर्थसहाय्य करण्याचे दायित्व स्विकारले आहे. आ. विखे पाटील यांनी राजकारणा पलीकडे जावून केलेल्या या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेवून पुणे विद्यापीठाने यंदाच्या वर्षी ‘जीवन साधना’ गौरव पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय केला.
पुरस्कार कोव्हीड योध्दयांना समर्पित..
आपल्या पुरस्काराबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना आ. विखे पाटील म्हणाले की, पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे आणि आदरणीय खासदार साहेबांनी घालून दिलेल्या मार्गावरुनच ग्रामीण भागात काम करीत राहीलो. या कामात कुटूबियांनी साथ दिली, कार्यकर्ते खंबीरपणे उभे राहीले. शिर्डी विधानसभा मतदारसंघातील जनता सतत पाठबळ देते म्हणूनच काम करताना आत्मविश्वास मिळतो. त्यामुळेच हा पुरस्कार जनता, सर्व कार्यकर्ते आणि जीवावर उदार होवून कोव्हीड संकटात समाजाची सेवा करणाऱ्या कोव्हीड योध्दयांना मी समर्पित करीत असल्याचे त्यांनी जाहीर केले.