◻ राज्यभरातील युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी अभ्यासले संगमनेरच्या विकासाचे मॉडेल
◻ दोन दिवसीय स्नेहमेळावा व शिबिरात राज्य पदाधिकारी आदरातिथ्याने भारावले
संगमनेर Live | युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी तसेच सर्व जिल्ह्यांचे अध्यक्ष यांनी दोन दिवसीय स्नेहमेळावा व शिबिरात सहभाग घेतला. यावेळी संगमनेर मधील विविध सहकारी संस्थांना भेटी दिल्या तसेच या दोन दिवसीय शिबिरात व स्नेहमेळाव्यात संगमनेरकरांनी केलेल्या आदरातिथ्याने राज्यातील सर्व युवक पदाधिकारी भारावले होते.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभरातील युवक व युवतींचा हा दोन दिवसीय अभ्यासदौरा व स्नेहमेळावा संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, यांच्यासह राज्य युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व विविध जिल्ह्यांमधील युवक काँग्रेसचे अध्यक्ष उपस्थित होते.
या भेटीमध्ये या पदाधिकाऱ्यांनी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना, राजहंस दूध संघ, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था, शेतकी संघ, राजहंस ट्रान्सपोर्ट कंपनी, शाम प्रो, अमृतवाहिनी बँक, संगमनेर मधील आद्यवत बस स्थानक, पंचायत समिती, प्रांत अधिकारी कार्यालय यांसह नामदार बाळासाहेब थोरात यांचे २४ तास कार्यरत असणारे यशोधन संपर्क कार्यालय या विविध संस्थांना भेटी दिल्या.
संगमनेरचा सहकार हा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वांवर कार्यरत असून येथील सहकारामुळे ग्रामीण विकास साधला आहे आणि त्यातून शहराची बाजारपेठ खुली आहे. गावोगावी असलेल्या सोसायट्या, पतसंस्था, दूध संस्था यांचे भक्कम जाळे सहकारातील अग्रगण्य शिखर संस्था, गुणवत्तेच्या शैक्षणिक संस्था हे संगमनेर तालुक्याच्या विकासात मोठा हातभार लावणारे आहे. ना. थोरात यांचे अविश्रांत काम करणारे नेतृत्व आणि त्यांनी राबवलेल्या विकासाच्या योजना या संपूर्ण राज्याला दिशादर्शक ठरत असल्याचे अनेक पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे
यावेळी सर्व युवक कार्यकर्त्यांना महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी संबोधित केले यावेळी ते म्हणाले की, काँग्रेस पक्षाला मोठी समृद्ध परंपरा असून तरूणांना या पक्षांमध्ये मोठी संधी आहे. प्रत्येक पक्षाला संकटातून जावे लागते. पण संकटामध्ये जो लढतो तो खरा सैनिक असतो. युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली चे युवक काँग्रेसचे मोठे संघटन राज्यभर उभे राहिले आहे. सातत्याने राज्यभर फिरून विविध जिल्ह्यांमध्ये संपर्क साधून त्यांनी युवकांमध्ये चैतन्य निर्माण केले आहे. त्यामुळे नक्कीच युवक काँग्रेसला अधिक बळकट मिळाली असल्याचे ते म्हणाले
यावेळी सत्यजित तांबे म्हणाले की, नामदार बाळासाहेब थोरात यांनी राजकारण व समाजकारण हे गोरगरीब माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी केले. निवडणुकीपुरते राजकारण करणे योग्य नाही. जनतेच्या जीवनात आनंद निर्माण करणे हे ध्येय ठेवून प्रत्येकाने काम करावे. आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या काळात श्रीमती सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी, नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तळागाळापर्यंत काँग्रेसचा विचार पोहोचविण्याचे काम आपण केले असून यामध्ये या पदाधिकाऱ्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. ग्रामीण विकास साधणारे संगमनेरचे सहकाराचे मॉडेल ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी आपण राबवा शक्य तेवढी मदत करू असे ते म्हणाले. यावेळी राज्यभरातील विविध पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले
दरम्यान याप्रसंगी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी सविस्तर माहिती दिली तर मालपाणी हेल्थ क्लब येथे आमदार डॉ. सुधीर तांबे व नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला याच बरोबर यानंतर सर्व कार्यकर्त्यानी उंबरी बाळापुर येथील गो सुधा हर्ष ऍग्रो फार्म ला भेट दिली आहे.
सत्यजित तांबे यांच्या पाहूणचाराने सहकारी भारावले..
युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर सत्यजित तांबे यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन युवकांची मोठी फौज निर्माण केली. प्रत्येक कार्यकर्त्याला वेळोवेळी ताकद दिली. यामुळे युवक काँग्रेसमध्ये चैतन्य निर्माण झाले असून या दोन दिवसीय शिबिराचे आयोजन आणि केलेले आदरतिथ्य यामुळे राज्यभरातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी भारावले.