संगमनेर Live (शिर्डी) | श्री साईबाबा संस्थान विश्वस्थव्यवस्था, शिर्डीच्या वतीने श्री साईबाबा वस्तु संग्रहालय व ध्यान मंदिर मंगळवार १५ फेब्रुवारी पासुन सकाळी ६ ते रात्रौ ९ यावेळेत साईभक्तांकरीता खुले करण्यात आले असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.
श्रीमती बानायत म्हणाल्या, श्री साईबाबांनी हाताळलेल्या वस्तुंबाबत साईभक्तांना माहिती व्हावी याकरीता मंदिर परिसरातील दिक्षित वाड्यामध्ये हे वस्तु संग्रहालय उभारण्यात आलेले असुन या ठिाकाणी श्रींनी वापरलेले जोडे, कफनी, चिलिम, उशा, गादी, रथ, पालखी, पलंग अशा अनेक वस्तु माहितीसह दर्शनार्थ ठेवण्यात आलेल्या आहे. तसेच श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना ध्यान, साधना व नामस्मरण करता यावे, म्हणुन संस्थानमार्फत श्रीसाईसत्यव्रत हॉलच्या पहिल्या मजल्यावर नव्याने ध्यान मंदिर तयार करणेत आलेले आहे.
या ठिकाणी एका दिवसात अंदाजे २५० ते ३०० भाविक ध्यानाकरीता येतात. परंतु गेल्या वर्षी जगभरात व देशात आलेल्या कोरोना विषाणूच्या संकटामुळे दि. १७ मार्च २०२० रोजी श्रींचे समाधी मंदिर बंद करण्यात आले होते. ह्या दोन वर्षात कोरोना विषाणूच्या संकटामुळे दोन वेळा राज्य शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले होते. त्यानंतर जेव्हा श्री साईबाबांचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले तेव्हा श्री साईबाबांची समाधी, व्दारकामाई, गुरुस्थान, ग्रामदैवत गणपती, शनिदेव, महादेव, लेंडीबागेतील श्री दत्त व नंददिपाचे दर्शन घेण्यासाठी खुले करण्यात येवुन एकाच रांगेतुन भाविकांची व्यवस्था करण्यात आलेली होती. मात्र यावेळी ध्यान मंदिर व श्री साईबाबा वस्तु संग्रहालय भाविकांसाठी खुले करण्यात आलेले नव्हते. परंतु साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांकडून वस्तुंचे संग्रहालय व ध्यान मंदिर खुले करण्याची मागणी वारंवार होत होती.
साईभक्त व शिर्डी ग्रामस्थांच्या मागणीनुसार संस्थानच्यावतीने दि. १५ फेब्रुवारी २०२२ पासुन सकाळी ६ ते रात्री ९ याकालावधीत श्री साईबाबा वस्तु संग्रहालय व ध्यान मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आलेले आहे. भाविकांना श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर या दोन्ही ठिकाणी कोरोना नियमांप्रमाणे प्रवेश दिला जाणार असून भाविकांनी कोविड नियमांप्रमाणे सामाजिक अंतराचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे व मास्कचा वापर करणे बंधनकारक राहील. तसेच ध्यान मंदिरात प्रवेश दिल्यानंतर भाविकांना अंदाजे १० ते १५ मिनिटे ध्यान करता येईल. याबरोबरच भाविकांना या ध्यान मंदिरात पारायण व पोथी वाचन करता येणार नाही, याची सर्व भाविकांनी व ग्रामस्थांनी नोंद घ्यावी.
भाविकांनी कोव्हीड १९ चे संदर्भातील सर्व मार्गदर्शक नियमांचे काटेकोरपणे पालन करुन श्री साईबाबा वस्तु संग्रहालय व ध्यान मंदिराचा लाभ घ्यावा, असे सांगुन सर्व साईभक्तांनी व शिर्डी ग्रामस्थांनी याबाबत संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन ही संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी केले.