◻ जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे आ. विखे पाटील यांची मागणी
संगमनेर Live (लोणी) | कोव्हीड संकटानंतर ग्रामीण भागात निर्माण झालेल्या समस्या विचारात घेवून जलसंपदा विभागाने लाभधारक शेतकऱ्यांची पाणीपट्टी माफ करावी अशी मागणी माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांच्याकडे पत्राव्दारे केली आहे.
यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात आ. विखे पाटील यांनी म्हटले आहे की, मागील तीन वर्षांपासून कोव्हीड संकटाने सर्वच समाज घटकांसमोर आव्हान उभी राहीली आहेत. यामध्ये प्रामुख्याने शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या अधिकच बिकट झाल्या आहेत. कोव्हीड संकटाच्या पहील्या संक्रमणात बाजार समित्याच बंद ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने शेतकऱ्यांना आपला उत्पादीत माल विक्रीसाठी आणता आला नाही. वेळप्रसंगी कवडीमोल भावाने माल विकण्याची किंवा फेकून देण्याचे प्रसंग शेतकऱ्यांवर आले या वस्तूस्थितीकडे आ.विखे पाटील यांनी लक्ष वेधले.
कोव्हीड संकटाचे वातावरण अद्यापही कायम असतानाच अवकाळी पाऊस आणि नैसर्गिक आपत्तीचाही सामना शेतकऱ्यांना करावा लागला आहे. यामध्ये शेतातील उभी पिक जमीनदोस्त झाल्याने कोणतेही उत्पन्न शेतकऱ्यांच्या हाती पडलेले नाही. शासनाने मदत जाहीर केली परंतू शेतकऱ्यांपर्यंत ती पोहचू शकली नाही. त्यातच घेतलेल्या शेती कर्जाची आणि थकीत वीज बीलाची वसुलीही सरकारने न थांबवल्याने शेतकऱ्यांवर सर्वच बाजूनी अर्थिक संकट ओढवले असल्याची बाब आ. विखे यांनी जलसंपदा विभागाच्या निदर्शनास आणून दिली.
यासर्व पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या लाभधारक शेतकऱ्यांकडून सक्तीने पाणीपट्टी वसूल करण्याचा जलसंपदा विभागाचा निर्णय हा शेतकऱ्यांवर अतिशय अन्यायकायक असल्याने शेतक-यांकडुन केली जाणारी पाणीपट्टी माफ करुन, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आशी मागणी आ. विखे पाटील यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.