१९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या वेदना अद्यापही कायम
संगमनेर Live (लोणी) | मुंबईसह राज्याला असुरक्षित करणाऱ्या व्यक्तिंसमवेत अर्थिक लागेबांधे उघड झाल्यानंतरही मंत्री नबाब मलिक यांचा राजीनामा न घेणारे मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली आहेत.? असा सवाल भाजपा नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
मंत्री नबाब मलीक यांना अटक झाल्यांनतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र यासंदर्भात मुख्यमंत्र्यानी मौन पाळले याचे आश्चर्ये वाटत असल्याकडे लक्ष वेधून आ. विखे पाटील म्हणाले की, १९९३ साली मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटाच्या वेदना अद्यापही कायम आहेत. असंख्य निरापराध माणसे मृत्यूमुखी पडल्याच्या स्मृती विरलेल्या नाहीत. या घटनेशी संबंध असलेल्या व्यक्तींशी मंत्री नबाब मलिक यांचे मनी लॉंडरींग झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांना अटक झाली तरीही मुख्यमंत्री त्यांचा राजीनामा घेणार नसतील तर देशहीताची ही प्रतारणाच म्हणावी लागेल असे विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.
राज्यातील आघाडी सरकारमधील मंत्र्यांचे एक एक कारनामे उघड होत आहेत. यापुर्वी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा शंभर कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील सहभागामुळे राजीनामा घेणारे मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीचे नेते नबाब मलीकांच्या बाबतीत वेगळी भूमिका घेत पाठराखण करीत असल्याकडेही आ. विखे पाटील यांनी लक्ष वेधले.
मंत्री नबाब मलिक यांचा राजीनामा न घेण्याबाबत मुख्यमंत्र्यांवर नेमका कोणाचा दबाव आहे.? नबाब मलिकांचे बॉम्ब स्फोटातील आरोपीशी उघड झालेल्या अर्थिक संबंधांना पाठीशी घालण्याचे काम महाविकास आघाडी कडून सुरू आहे. आशा लोकांना बरोबर घेवून शिवसेना राज्य करणार का.? असा प्रश्नही विखे यांनी उपस्थित केला.
भारतीय जनता पक्षाने मंत्री नबाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे. यासाठी आंदोलन सुरू केली आहेत. भारतीय जनता पक्षाचे सर्व कार्यकर्ते आजपासून रस्त्यावर उतरले आहेत. नबाब मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलनाला इशाराही आ. विखे यांनी दिला.