◻ संगमनेर तालुक्यातील कोठे खुर्द शिवारातील घटनेने तालुका हळहळला
संगमनेर Live | संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील कोठे खुर्द गावांतर्गत असलेल्या खांडगेदरा येथे शुक्रवारी (दि. ४ फेब्रुवारी) दुपारी धक्कादायक घटना उघडकीस आली असून येथील एका विहिरीत आईसह दोन मुली व एका चिमुकल्या मुलाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच गावासह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबत घारगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, कोठे खुर्द गावांतर्गत असलेल्या खांडगेदरा येथे बाळासाहेब गणपत ढोकरे, पत्नी स्वाती बाळासाहेब ढोकरे, मुलगी भाग्यश्री बाळासाहेब ढोकरे, माधुरी बाळासाहेब ढोकरे व चिमुकला मुलगा शिवम बाळासाहेब ढोकरे हे सर्व गुण्यागोविंदाने राहात होते. या संसाराला नजर लागली आणि जवळपास संपूर्ण कुटुंबावरच नियतीने काळाचा घाला घातला. घराशेजारीच असलेल्या विहिरीत स्वाती ढोकरे, भाग्यश्री ढोकरे, माधुरी ढोकरे व चिमुकला मुलगा शिवम यांचे मृतदेह शुक्रवारी दुपारी आढळून आले.
या घटनेची वार्ता वाऱ्यागत पसरताच गावकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर चारीही मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आले. तोपर्यंत घटनेची माहिती घारगाव पोलिसांना मिळाली होती. माहिती समजताच पोलीस निरीक्षक सुनील पाटील, पोलीस नाईक राजेंद्र लांघे, संतोष खैरे आदिंनी घटनास्थळी धाव घेतली. खासगी रूग्णवाहिकेला बोलावून चारही मृतदेह शवविच्छेदनासाठी संगमनेरच्या कुटीर रुग्णालयात हलविले होते.
दरम्यान, पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी मच्छिन्द्र एकनाथ खांडगे यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील हे करत आहे. या धक्कादायक घटनेने खांडगेदरा व कोठे खुर्द गावावर शोककळा पसरली आहे. तर तालुक्यात खळबळ उडाली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.