◻संगमनेर शहरातील घटनेने तालुक्यात खळबळ
◻ स्वस्तात जमीनीच्या अमिषाने ६ लाख रुपयाला फसवले
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडीतील महिलेला अस्तित्त्वात नसलेल्या जमिनीची विक्री करुन तब्बल सहा लाख रुपयांना गंडा घातल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून या प्रकरणी संगमनेर शहरातील एकासह ‘त्या’ महिलेच्या व्याह्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार देण्यात आली आहे.
गुंजाळवाडी शिवारात राहणार्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून ही घटना सन २०१६ साली घडली आहे. सदर महिलेच्या छोट्या मुलीचे सासरे दिनकर कवडे (रा. धांदरफळ बुद्रुक) यांनी त्या महिलेला तालुक्यातील पिंपळगाव देपा येथे मोक्याची अडीच एकर शेतजमीन असून ती अवघ्या सहा लाखांत मिळत असल्याचे सांगितले.
या जमिनीच्या व्यवहारासाठी त्यांनी मनोहर मोरे (रा. ऐश्वर्या पेट्रोल पंपामागे) याची ओळख करुन दिली. त्यानंतर या दोघांनीही महिला व त्यांची सासू या दोघीनाही पिंपळगाव देपा येथे नेवून सदरच्या जमिनीचे क्षेत्र दाखवले व त्याचा गट क्र. २५७/१ असल्याबाबत सांगत ही जमिन खुप स्वस्तात मिळत असल्याचे पटवून दिले.
त्यासाठी सासूचे सोने मोडले, त्यांच्या जून्या ठेव पावत्याही मोडल्या व काही पैसे दुसर्या मुलीकडून उसनवारीनेही घेतले व १६ ऑगस्ट २०१६ रोजी संगमनेर येथे वकीलामार्फत विसारपावती करुन सदर शेतजमीनीची सहा लाखांत विक्री केल्याचे दाखवण्यात आले. यानंतर काही दिवसांनी त्या महिलेसह त्यांच्या कुटुंबियांनी आपण घेतलेल्या शेतजमीनीत जावून पिकपाण्याबाबत चाचपणी केली असता त्यांनी खरेदी केलेला गट क्र. २५७/१ अस्तित्त्वातच नसल्याची धक्कादायक माहिती त्यांना समजली.
त्यामुळे या सर्वांनी लागलीच आपले व्याही कवडे यांचे घर गाठून त्यांच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी तुमचे सगळे पैसे मनोहर मोरे यांच्याकडे असल्याचे सांगितले. मोरे यांच्याकडे जावून पैशांची मागणी केली असता त्यांनी पैसे देतो, काही दिवस थांबा असे सांगितले.
सदर महिलेच्या बँक खात्यावर असलेला त्यांचा मोबाईल क्रमांक बदलून मनोहर मोरे याने परस्पर स्वतःचा मोबाईल नंबर नोंदविल्याचा व त्या खात्यावरुन आर्थिक व्यवहार केल्याचे दिसून आले. यावर त्यांनी बँकेकडे तक्रार करीत पुन्हा आपला मोबाईल क्रमांक नोंदवला. यासर्व प्रकारावरुन आपले व्याही दिनकर कवडे व मनोहर मोरे या दोघांनी संगनमताने आपली फसवणूक केली व अस्तित्त्वातच नसलेल्या शेतजमिनीची आपल्याला विक्री करुन सहा लाखांचा गंडा घातला, तसेच परस्पर बँकेला अर्ज देवून खात्यावरील आपला मोबाईल क्रमांकही बदलल्याचे स्पष्ट झाल्यावर त्यांनी शहर पोलिसांत धाव घेवून या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक निवांत जाधव करीत आहेत.