◻ खांडगाव येथील तरुणाला कोपरगावच्या तरुणीने गंडा घातला
◻आईसह नातेवाईकही निघाले खोटे
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील ३५ वर्षीय तरुणाने कोपरगाव येथील तरुणीशी विवाह केल्यानंतर आठच दिवसात तरुणीने आपल्याला फसवल्याचे लक्षात आल्याने याबाबत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी नवरी मुलीसह तिची खोटी आई, भाऊ व अन्य एका महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार खांडगाव येथील एका मुलासाठी त्यांच्या एका नातेवाईकाने शिंदोडी येथील त्यांच्या मित्राच्या मदतीने सावळीविहीर (ता. कोपरगाव) येथील स्थळ आणले. मात्र त्यासाठी दोन लाख रुपये द्यावे लागतील असेही त्यांना सांगितले.
त्यानुसार २२ फेब्रुवारी रोजी त्या दोघांसह उपवर मुलगा व त्याचे चार नातेवाईक सावळीविहीर येथे गेले. यावेळी मीना कस्तुरी नावाच्या महिलेने आपली मुलगी दाखविली असता त्यांनी मुलाचे घर पहायचे ठरविले, मुलाचे घर पाहण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर मुलीची आई मीना कस्तुरी, भाऊ आवेश, अपेक्षा शेख उर्फ राणी यांनी लागलीच लग्नाला होकर दिल्याने त्याच दिवशी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत त्या दोघांचेही लग्न लावून देण्यात आले.
या सोहळ्याचे छायाचित्रणही केले गेले. त्या दोघांचे लग्न लागताच ठरल्याप्रमाणे मुलाच्या चुलत्याने शिंदोडीच्या मध्यस्थामार्फत मुलीच्या आईला एक लाख रुपयांची रक्कम रोख स्वरुपात सोपविली. त्यानंतर सावळीविहीर येथून आलेली ही मंडळी निघून गेली.
२४ फेब्रुवारी रोजी मुलीची कथित आई मीना कस्तुरी हिने फोन करुन लग्नाचे प्रतिज्ञापत्र (नोटरी) करायची असल्याने त्या दोघांनाही कोपरगाव येथे बोलावल्यानंतर ठरल्याप्रमाणे राहिलेली एक लाखाची रक्कम मुलीच्या आईला देण्यात आली व नवरीमुलीसह ती सगळी मंडळी पुन्हा खांडगावला आली.
गेल्या बुधवारी (दि. २) रात्री आठच्या सुमारास ‘त्या’ मध्यस्थाचा मुलाला फोन आला व त्यांनी सांगितले की ‘तू लग्न केलेली मुलगी नाशिक पोलीस स्टेशनला मिसींग नोंद झालेली आहे.’ त्यामुळे त्याने आपल्या कुटुंबासमोरच तिच्याकडे विचारणा केली असता सदरची मुलगी मुळची नाशिकमधील असून तिचे आई-वडील तेथेच राहातात. तिचे खरे नाव योगिता नससिंग कस्तुरी असल्याचेही तिने सांगितले व यापूर्वी अशाचप्रकारे पाटणा व मालेगाव येथील तरुणाकडून एक लाख रुपये घेवून आपले लग्न लावण्यात आले होते अशी माहिती दिली.
दरम्यान सगळ्या प्रकारातून आपली फसवणूक झाल्याचे मुलाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी थेट संगमनेर शहर पोलीस ठाण्यात त्यानुसार शहर पोलिसांनी नवरी मुलगी योगिता नरसिंग कस्तुरी (रा. जेलरोड, नाशिक), तिची खोटी आई शीतल अनिल मोरे (रा. सावळीविहीर), खोटा भाऊ आवेश शेख व अपेक्षा शेख उर्फ राणी (दोघेही रा. उपनगर, नाशिक) यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.