◻ इनोव्हा कार व टेम्पो जप्त तर पाच जणांविरुध्द घारगाव पोलीसात गुन्हा दाखल
संगमनेर Live | विजेच्या टाॅवर चढून तार कापत असताना तार तुटतेवेळी पोटास बांधलेल्या दोरीचा फास लागून एका जणाचा मृत्यू झाल्याची घटना संगमनेर तालुक्यातील शिंदोडी शिवारात रविवार (दि. ६) रोजी पहाटे एक ते तीन वाजेच्या दरम्यान घडली असून याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत घारगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की योगेश रावसाहेब विघे (वय - २० रा. पिलानी वस्ती चिकलठाण ता. राहुरी) यास विशाल राजेंद्र पंडीत (वय - १८), आदित्य अनिल सोणवने (वय - २०, दोघे रा. शिंदोडी) हे दोघे घेवून आले व त्याचे साथीदार संकेत सुभाष दातीर (वय - २६, रा. प्रिंप्री लौकी) व सरफराज इक्बाल शेख (रा. रामगड ता. श्रीरामपुर) व एक विधीसंघर्षीत बालक या सर्वानी पहाटे एक ते तीन वाजेच्या दरम्यान शिंदोंडी शिवारात आणले.
त्यानंतर टाॅवरची उंची जास्त असताना देखील योगेश विघे यास चोरी करण्याच्या उद्देशाने बळजबरीने विजेच्या टाॅवर चढवले आणि त्यास टाॅवरवरील अॅल्युमिनीअम धातुच्या विजेच्या तारा कापण्यास सांगितले व त्याच्याकडून तारा कापून घेतल्या. त्याच दरम्यान तारा कापत असताना तार तुटतेवेळी योगेश याच्या पोटास बांधलेल्या दोरीचा फास लागला होता. त्यानंतर वरील पाच जणांनी इनोव्हा कार (एमएच २० एजी. ५२५८) मधून योगेशला औषध उपचारासाठी लोणी येथिल रुग्णालयात नेले मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.
याप्रकरणी रावसाहेब सुखदेव विघे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून घारगाव पोलीसांनी चौघांसह एका विधीसंघर्षीत बालका विरूद्ध गुन्हा रजिस्टर नंबर ५५/२०२२ नुसार भादवी कलम ३०४, ३७९, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुनील पाटील हे करत असून या घटनेत पोलीसांनी इनोव्हा कारसह टेम्पोही जप्त केला आहे. दरम्यान या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.