संगमनेर Live | आधुनिक काळात जग वेगाने पुढे जात असून त्यामध्ये महिलांची भूमिका महत्वाची आहे. त्यासाठी प्रत्येक महिलेने स्वतः सक्षम होणे गरजेचे असल्याचे मत संगमनेर शहराच्या प्रथम नागरिक सौ. दुर्गाताई तांबे यांनी व्यक्त केले.
सहकारमहर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संस्थेचे रजिस्ट्रार बाबुराव गवांदे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिनानाथ पाटील, उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ, समन्वयक प्रा. गोरक्षनाथ थोरात आदि उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना सौ. दुर्गाताई तांबे यांनी महिला सक्षमीकरण याविषयी बोलताना, प्रत्येक स्री हि आपल्या दैनंदिन कामातूनच आपली जबादारी सक्षमपणे सांभाळत असते मात्र, तिला समाजात मानसन्मान कमी प्रमाणात मिळत असतो. तरी सुद्धा ती कोणतीही तक्रार न करता आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडत असते. महिलांनी आपली नोकरी, दैनंदिन कामे पार पाडत असताना स्वतः कडे व स्वतःच्या आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी रजिस्ट्रार बाबुराव गवांदे यांनी कार्यक्रम प्रसंगी बोलताना, देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, कल्पना चावला या महिलांनी देखील आपल्या कर्तुत्वाने आपल्याला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. तसेच अलीकडील काळातही महिलांचा विकास अधिक होताना दिसून येतो हे महिलांच्या सबलीकरणाचे आणि सक्षमीकरणाचे यश म्हणावे लागेल.
याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पाटील म्हणाले कि, कोणत्याही देशाच्या विकासामध्ये स्रीयांची भूमिका महत्वाची आहे. कारण त्यांच्या शिवाय देशाचा विकास अशक्य असल्याने त्यांना विकासाच्या प्रवाहात आणून देशाचा अधिक जलद गतीने विकास साधता येईल.
या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. बाळासाहेब वाघ यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा. सोनल वाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार डॉ. विलास कोल्हे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील विविध विभाग प्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेत्तर सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.