◻भारतीय जनता पक्षाचा ४२ वा. स्थापना दिवस उत्सहात संपन्न
◻शिर्डी विधानसभा मतदार संघातील २७० बुथ कमिट्यांचा सहभाग
संगमनेर Live (लोणी) | शिर्डी विधानसभा मतदार संघातील २७० बुथ कमिट्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचा ४२ वा. स्थापना दिवस संपन्न झाला. या निमित्ताने पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गाव आणि वाड्या वस्त्यांमध्ये पक्षाचा झेंडा फडकावला. स्थापना दिवसाचे औचित्य साधून सामाजिक न्याय पंधरवाड्याचे आयोजन करुन केंद्र सरकारच्या योजनांची माहीती लोकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मतदार संघामध्ये २७० बुथ कमिट्या कार्यरत आहेत. या बुथकमिट्यांच्या माध्यमातून पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते लोकसंपर्कामध्ये असतात. स्थापना दिवसाच्या निमित्ताने या सर्व बुथ कमिट्यांमध्ये कार्यक्रम करण्यात आले. पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गावांमध्ये पक्षाचा झेंडा उभारुन अभिवादन केले. गावात आणि वाड्यावस्त्यांवरही घरांवर पक्षाचा झेंडे फडकलेले पाहायला मिळाले. ठिकठिकाणी महिलांचाही सहभाग यामध्ये दिसून आला.
आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी कमळ चिन्हाची आकर्षकपणे काढलेली रांगोळी सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी घरावर पक्षाचा झेंडा फडकावून पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पक्षाला पाठबळ देणाऱ्या जनतेला शुभेच्छा दिल्या.
शिर्डी येथे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा संदेश दृकश्राव्य माध्यमातून सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सामुहीकपणे ऐकला. भारत माता की जय आणि मोदीजी यांच्या जिंदाबादच्या घोषणा देवून कार्यकर्त्यांनी सभागृह दणाणून सोडले. आश्वी महाविद्यालयातही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोदीचा कार्यक्रम पाहाण्यासाठी मोठी गर्दी केली होती.