संपूर्ण ऊस गाळप होईपर्यत साखर कारखाने सुरु ठेवा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संगमनेर Live
0
१ मे नंतर गाळप झालेल्या अतिरिक्त ऊस गाळपासाठी २०० रू प्रतिटन अनुदान

◻शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी सरकारचे निर्देश

◻बीड, जालना, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ऊस शिल्लक राहण्याचे प्रमाण अधिक

संगमनेर Live (मुबंई) | राज्यात यावर्षी ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप शुल्क आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी दिनांक १ मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान म्हणून रुपये २०० प्रती टनप्रमाणे अतिरिक्त ऊस गाळप अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त ऊस गाळप अनुदान आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, सहकार विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, कृषी सचिव एकनाथ डवले, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

यामुळे सुमारे १०० कोटी रुपयांचा वित्तीय भार पडणार असून राज्यात १ मे २०२२ नंतर हंगाम संपेपर्यंत अंदाजे ५२ लाख टन गाळप अपेक्षित आहे. यापैकी आजअखेर ३२ लाख टन गाळप झाले आहे. तसेच १ मे २०२२ नंतर गाळप होणाऱ्या व ५० किलोमीटर पेक्षा जास्त अंतरावर वाहतूक होणाऱ्या साखर आयुक्तांनी अनिवार्य ऊस आदेश काढलेल्या ऊसास प्रतीटन पाच रुपये प्रती किलोमीटर वाहतूक अनुदान देण्यात येईल, असेही सहकार मंत्री पत्रकार परिषदेत माहिती दिली.

गाळप हंगाम २०२१-२२ मध्ये राज्यात एकूण १३.६७ लाख हेक्टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध आहे. सन २०२०-२१ मध्ये ११.४२ लाख हेक्टर क्षेत्र ऊस पिकाखाली होते. मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र अधिक आहे. तसेच १६ मे २०२२ अखेर १०० सहकारी व ९९ खासगी असे १९९ साखर कारखान्यांकडून १३००.६२ लाख टन ऊस गाळप झालेले आहे. मागील वर्षापेक्षा सुमारे ५५,९२० टन प्रतीदिन जास्त गाळप क्षमतेने गाळप होत आहे. मागील वर्षी याच दिनांकास १०१३.३१ लाख टन गाळप झालेले होते. चालू वर्षी २८७.३१ लाख टन गाळप जास्त झालेले आहे. बीड, जालना, अहमदनगर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये ऊस शिल्लक राहण्याचे प्रमाण अधिक आहे. याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !