◻ महाराजस्व अभियानांतर्गत १ ते १३ जून कलावधीत चालणार मोहीम
◻ १३ जून रोजी विविध शाळा व महाविद्यालये या ठिकाणी विद्यार्थ्याना दाखल्यांचे वाटप
संगमनेर Live | संगमनेर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या वतीने महाराजस्व अभियानांतर्गत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विविध प्रवेश प्रक्रिये करिता आवश्यक दाखले उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले आहे. या मोहीमेचा लाभ जास्तीत विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावा. असे आवाहन संगमनेर उपविभागीय अधिकारी शशिकांत मंगरूळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
या मोहीमेत जातीचा दाखला, नॉन क्रिमिलेअर, डोमेसाईल, वय राष्ट्रीयत्व, अधीवास, डोंगरी दाखला इत्यादी प्रकारचे प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक दाखले दिले जाणार आहेत.
कागदपत्रे काढताना येणाऱ्या अडचणी दूर करून किमान कागदपत्रात व शासकीय शूल्क दरात कागदपत्रे उपलब्ध करुन देण्याच्या हेतूने संगमनेर व अकोले तालुक्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व महाविद्यालये यांच्या सहकार्यातून शाळा, महाविद्यालयातच दाखले वितरीत करण्यासाठी ही मोहीम आयोजित करण्यात आली आहे.
या मोहीमेत १ ते ४ जून या कालावधीत शिक्षक विद्यार्थ्याना आवश्यक असलेले दाखले यादी तयार करणे, दाखल्यांसाठी लागणारे कागदपत्र जमा करणे, शुल्काची रक्कम जमा करण्याचे काम करतील. ५ ते ६ जून रोजी सेतू चालक प्रत्यक्ष शाळेला भेट देऊन प्राप्त झालेले अर्ज ऑनलाईन करण्याचे काम करतील.
७ जून ते १० जून रोजी उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयाकडून ऑनलाईन दाखले तपासून मंजूर करण्याचे काम केले जाईल. १३ जून रोजी विविध शाळा व महाविद्यालये या ठिकाणी मंजूर करणेत आलेल्या दाखल्यांचे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष वाटप करणेत येईल.
महा राजस्व अभियानांतर्गत ही विशेष मोहीम राबविली जाणार आहे. या संधीचा जास्तीत जास्त विद्यार्थी, पालक आणि सर्व सामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन मंगरूळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.