इयत्ता दहावीचा उद्या निकाल

संगमनेर Live
0
शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांची माहिती

संगमनेर Live (मुंबई) | महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च- एप्रिल २०२२ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल उद्या दिनांक १७ जून रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली.

हे निकाल www.mahresult.nic.in, http://sscresult.mkcl.org, https://ssc.mahresults.org.in, https://lokmat.news18.com, https://www.indiatoday.in/education-today/results, http://mh10.abpmajha.com, https://www.tv9marathi.com/ board-result-registration-for-result-marksheet-10th या संकेतस्थळांवर पाहता येतील.

या परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरून उपलब्ध होतील तसेच या माहितीची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.
 तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळांना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांची छायाप्रत, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. 

यासाठी आवश्यक अटी / शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणीसाठी सोमवार, दिनांक २० जून २०२२ ते बुधवार, दिनांक २९ जून २०२२ पर्यंत व छायाप्रतीसाठी सोमवार, दिनांक २० जून ते शनिवार, दिनांक ९ जुलै २०२२ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पद्धतीने शुल्क (Debit Card/Credit Card/ UPI / Net Banking याद्वारे) भरता येईल.

मार्च- एप्रिल 2022 परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.

मार्च- एप्रिल २०२२ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ठ होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/ गुणसुधार (Class
Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील. जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी सोमवार दिनांक २० जून २०२२ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहेत. 

त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे. मार्च-एप्रिल २०२२ मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वाटपाबाबत स्वतंत्ररित्या कळविण्यात येईल, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags

Post a Comment

0Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Post a Comment (0)

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Learn More
Accept !