◻ कर्जुले पठार शिवारातील घटना
◻ स्थानिकासह पोलिस ही धावले मदतीला
संगमनेर Live | संगमनेर तालुक्यातील पठारभागावरील कर्जुले पठार येथील पुणे - नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या लगतच्या रस्त्यावर (सर्व्हिस रोड) ट्रॅक्टर उलटून झालेल्या अपघातात योगेश विलास बर्डे (वय - २२, रा. नायगाव थेऊर, पुणे) हा जागीच ठार झाल्याची दुर्देवी घटना शुक्रवारी (दि. १७) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास घडली आहे.
याबाबत डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राच्या पोलीस सूत्रांकडून समजलेली अधिक माहिती अशी की, योगेश बर्डे हा कर्जुले पठार येथील नातेवाईकांकडे आलेला होता. शुक्रवारी सकाळी नाशिकच्या दिशेने ट्रॅक्टरमधून वरूडी फाट्याकडे येत होता. त्यानंतर ट्रॅक्टर गावाच्या पुढे आल्यानंतर थेट पलटी झाला.
यामध्ये ट्रॅक्टरखाली दबून योगेश बर्डे याचा जागीच मृत्यू झाला. सदर अपघात झाल्याचे समजताच परिसरातील कर्जुले पठारचे सरपंच रवींद्र भोर, उपसरपंच तुकाराम आगलावे, अॅड. सुभाष गोडसे, सुखदेव बोंबले, सचिन पडवळ आदिंनी धाव घेऊन त्यास बाहेर काढले आणि रुग्णवाहिकेतून संगमनेरला हलविले.
दरम्यान या घटनेची माहिती समजताच डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्राचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, मनेष शिंदे, योगीराज सोनवणे, उमेश गव्हाणे, नंदू बर्डे, अरविंद गिरी यांनी घटनास्थळी धाव घेतली. जेसीबीला पाचारण करुन अपघातग्रस्त ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजूला घेतला. या घटनेची पोलिसांनी नोंद केली आहे.