◻ अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकार कडून सूडबुद्धीने गांधी परिवाराला त्रास 
संगमनेर Live | देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश उभारणी अत्यंत मोलाचे योगदान देणाऱ्या गांधी कुटुंबाला सूडबुद्धीने जाणीवपूर्वक त्रास देण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. खा. राहुल गांधी हे शूर योद्धे असून ते कधीही सरकारला शरण जाणार नाही. महागाई, बेरोजगारी, ढासळलेली अर्थव्यवस्था हे अपयश झाकण्यासाठी केंद्र सरकारकडून सूडबुद्धीने विरोधी पक्षांच्या नेत्यांवर ईडीच्या कारवाया होत असल्याची टीका नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे.
संगमनेर बस स्थानक येथे संगमनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने खा. राहुल गांधी व काँग्रेस पक्षाध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना पाठवलेल्या ईडी नोटीसच्या निषेधार्थ धरणे आंदोलन झाले. यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ, नगराध्यक्षा सौ. दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात आदींसह काँग्रेसच्या सर्व सेलचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार डॉ. तांबे म्हणाले की, स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देश उभारणीत गांधी व नेहरू कुटुंबाचे मोठे योगदान आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी स्वतःची सर्व संपत्ती देशाकरता दान केली होती. स्वर्गीय इंदिरा गांधी व राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी प्राणांची आहुती दिली. मात्र त्याचे परिवाराला टार्गेट करून सूडबुद्धीने खा. सोनिया गांधी व राहुल गांधी यांना नोटिसा पाठवल्या जात आहे. सध्या देशात अत्यंत अस्थिरता निर्माण झाली आहे. महागाईने उच्चांक गाठला आहे. बेरोजगारी वाढली आहे. केंद्र सरकार सर्व पातळ्यांवर अपयशी ठरले असून हे अपयश झाकण्यासाठी सीबीआय व तत्सम केंद्रीय यंत्रणांचा वापर केंद्र सरकार करत आहे.
देशातील लोकशाही पूर्णपणे धोक्यात आली असून प्रत्येक काँग्रेस जनाने या विरुद्ध आवाज उठविण्यासाठी घरोघर जाऊन काँग्रेसचा विचार सांगितला पाहिजे. खा. राहुल गांधी हे शूर योद्धे आहेत ते कधीही केंद्र सरकारच्या या कारवायांना शरण जाणार नाहीत. संपूर्ण देशामध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठे जनआंदोलन होत आहे. राज्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष एकवटला असून राज्यातील जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी राहिली आहे. देश आणि लोकशाही वाचवायचे असेल तर प्रत्येकाला मोदी सरकारच्या जुलमी हुकूमशाही विरुद्ध लढावे लागेल असे ते म्हणाले
सौ. दुर्गाताई तांबे म्हणाल्या की, सध्या देशात ईडी, सीबीआय या यंत्रणा सरकार पेक्षा जास्त कार्यान्वित झाले आहे. लोकविकासाचे कामे करणे ऐवजी जनतेमध्ये मतभेद निर्माण केली जात आहेत. विरोधी राजकीय पक्षांना नामशेष करण्याचा हा प्रकार सुरू आहे.
गांधी कुटुंब हे देशासाठी त्याग करणारे कुटुंब आहे भारत जोडो यात्रा सोनिया गांधी यांनी सुरु केली आणि मोदी सरकारने घाबरून त्यांना ईडीच्या नोटिसा पाठवल्या आहेत हे अत्यंत निंदनीय असल्याचे त्या म्हणाल्या.
तालुकाध्यक्ष बाबा ओहोळ म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे ज्या प्रदेशात जातात तेथील वेश परिधान करतात मात्र विचार घेत नाहीत. तोडा आणि फोडा ही नीती केंद्र सरकार कडून अवलंबली जात आहे. जे प्रकरण आठ वर्षांपूर्वी बंद झाले ते उकरून काढून काँग्रेस पक्षाला संपवण्याचा डाव केंद्र सरकारने आखला आहे मात्र काँग्रेसची कधी संपणार नसून फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेऊन अन्यायाविरुद्ध लढत राहील असे ते म्हणाले
डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, नॅशनल हेरॉल्ड या वृत्तपत्राने स्वातंत्र्य प्राप्तीत मोठे योगदान दिले आहे. नेहरू-गांधी भगतसिंग, मौलाना आझाद यांचे विचार जन - सामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम या वृत्तपत्राने केले आहे. लोकशाही जिवंत ठेवणाऱ्या या वृत्तपत्राच्या पाठीशी आपण सर्वांनी उभे राहिले पाहिजे. खा. राहुल गांधी हे एकटे मोदी सरकार विरुद्ध लढत असून त्यांच्या पाठीशी संपूर्ण देश असल्याचे त्या म्हणाल्या.