संगमनेर Live | दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर आषाढी वारीनिमित्त पंढरपूरसाठी निघालेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे पारेगाव बुद्रुक येथे मोठ्या उत्साहात आणि आनंदात आगमन झाले. यावेळी कॅन्सर तज्ञ डॉक्टर जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांनी श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे स्वागत केले.
पारेगाव बुद्रुक येथे पंढरपूरसाठी निघालेल्या या पालखीचे सुमारे वीस हजार वारकऱ्यांचा समवेत आगमन झाले. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात, बी. आर. चकोर, अँड. त्र्यंबक गडाख, डॉ. दत्तात्रय गडाख, दौलत गडाख, संपतराव गोडगे, साहेबराव गडाख, अँड सौ. संध्याताई गडाख, प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे, गटविकास अधिकारी अनिल नागणे, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते.
दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर आलेल्या या दिंडीमध्ये सुमारे वीस हजार भाविक मोठ्या भक्तिभावाने आणि आनंदाने सहभागी झाले आहेत. हरिनामाचा गजर करत, टाळ  मृदुंग च्या तालावर विविध अभंग गात हे वारकरी तल्लीन झाले होते. अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या आनंदाने भक्तिभावाने लेझीम पथक पारंपरिक वाद्य व वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी व गावकऱ्यांनी या पालखीचे स्वागत केले.
याप्रसंगी बोलताना डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. सामाजिक समतेचा आणि एकतेचा संदेश देणारी पंढरपूरची वारी आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेली ही वारी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. या वारीमध्ये सर्वजण भेदभाव विसरून एकत्र येतात. जात-पात-धर्म सर्व विसरून अगदी आनंदाने तल्लीन होऊन पांडुरंगाच्या चरणी लीन होतात. महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी या वारीचे मोठ्या आनंदाने आपण सर्वजण स्वागत करत असतो मात्र मागील दोन वर्ष कोरोना मुळे वारी बंद होती. दोन वर्षाच्या कोरोना संकटानंतर हा अद्भुत सोहळा सर्वांना अनुभवायला मिळणार आहे .
यावर्षी राज्यांमध्ये सर्वत्र खूप चांगला पाऊस पडू दे सर्व लोक सुखी आणि आनंदाने होऊ दे अशी प्रार्थना ही डॉ. जयश्री ताई थोरात यांनी यावेळी पांडुरंग चरणी केली.
विविध वारकऱ्यांनी फुगडी खेळत डोक्यावर तुळशी वृंदावन घेत जयश्री ताई थोरात यांच्यासमवेत अभंग गायले. यावेळी सर्वत्र हरिनामाचा गरज आणि भक्तिमय वातावरणाने परिसर दुमदुमून गेला होता.