◻ प्रवरा नदी बचाव कृती समितीचे आ. तांबे यांना पत्रकाव्दारे उत्तर
◻ नागरीकांच्या आरोग्यासाठी उपस्थित केलेला प्रश्न हा जाणीवपूर्वक कसा.?
संगमनेर Live | नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित पाण्याचा प्रश्न विधानसभेत आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी जाणीवपूर्वक नव्हे तर, नदीकाठच्या गावातील नागरीकांच्या धोक्यात आलेल्या आरोग्याच्या हिताकरीता मांडला होता, त्यामुळे उगाच दिशाभूल करुन, आपले अपयश झाकण्याचा प्रयत्न करु नये असे आवाहन प्रवरा नदी बचाव कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
संगमनेर शहरात एस. टी. पी प्रकल्पावरुन सुरु असलेल्या आंदोलनाच्या प्रार्श्वभूमिवर आ. डॉ. सुधिर तांबे यांनी केलेल्या वक्तव्यात आ. विखे पाटील यांनी मार्च महिन्यात विधानसभा आधिवेशनात शहरातील प्रदूषित पाण्याचा प्रश्न जाणीवपूर्वक उपस्थित केल्याचा उल्लेख केला. त्याला प्रवरा नदी बचाव कृती समितीच्या सदस्यांनी एका पत्रकाव्दारे उत्तर दिले आहे.
प्रवरा नदीपात्रात संगमनेर नगपालिका हद्दीतील सर्व उद्योग व्यवसाय, हॉटेल तसेच संगमनेर कारखाना, दूध संघाचे रसायणयुक्त पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठच्या गावांना याचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. याविरोधात प्रवरा नदी बचाव कृती समितीने राज्य सरकार तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारी केल्या होत्या. प्रदूषित पाण्याचा त्रास ज्या नदी काठच्या गावांना होती ती सर्व गावे आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिर्डी विधानसभा मतदार संघातील असल्याने कृती समितीने आ. विखे पाटील यांची भेट घेवून, या गंभिर प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. ग्रामस्थांच्या भावनांची दखल घेवूनच आ. विखे पाटील यांनी विधानसभा आधिवेशनात प्रश्न उपस्थित केला. नागरीकांच्या आरोग्यासाठी उपस्थित केलेला प्रश्न हा जाणीवपूर्वक कसा म्हणता येईल असा सवाल कृती समितीने आ. डॉ. तांबे यांना केला आहे.
प्रदूषित पाण्याच्या संदर्भातील प्रश्न हा अचानक निर्माण झालेला नाही. वर्षानुवर्षे याचा त्रास नदीकाठच्या गावांना होत आहे. पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या आणि शेतीच्या आरोग्याचे प्रश्न या पाण्यामुळे निर्माण झाले आहेत. वेळोवेळी याच्या तक्रारीही झाल्या आहेत. परंतू याची दखल न घेतल्यामुळे कृती समितीच्या माध्यमातून ग्रामस्थांनी संघटीतपणे सुरु केलेल्या लढाईचा आवाजच आ. विखे पाटील यांनी विधानसभेत पोहोचविला.
त्यानंतरच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने येवून नदीपात्रातील पाण्याचे नमुनेही तपासले त्यामुळे सुरु झालेली कारवाई ही नगरपालिकेचा हलगर्जीपणा समोर आणणारी ठरली असून, पालिकेवर आता दंडात्मक कारवाई सुरु झाली तर, त्याचा दोष आ. विखे पाटील यांना देवून संगमनेर नगरपालिका एकप्रकारे आपले अपयशच दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जर तुमच्या संस्थाकडून नदीपात्रात प्रदूषित पाणी सोडलेच जात नसेल तर आंदोलन करण्याचा आणि आवाज उठविण्याचा प्रश्न आलाच नसता. आपली चुक झाकण्यासाठी आ. विखे पाटील यांच्यावर दोषारोप करु नका.
प्रदूषित पाण्या विरोधातील लढाई ही कोणत्याही राजकारणासाठी नाही, कोणाच्या सांगण्यावरुन आम्ही सुरु केलेली नाही आणि कोणाच्या सांगण्यावरुन आम्ही ती थांबविणारही नाही असा स्पष्ट इशारा कृती समितीने दिला आहे. या पत्रकावर सचिन शिंदे, पप्पू गाढे, जोर्वेचे उपसरपंच गोकूळ दिघे, उत्तम वर्पे, ज्ञानदेव वर्पे, राहुल दिघे, प्रविण शेपाळ, मच्छिंद्र भागवत, बाबासाहेब ठोसर, सतिष वाळुंज आदिंची नावे आहेत.