◻एस. टी. पी प्रकल्पाबद्दल गैरसमज करून घेऊ नका ; आ. डॉ. तांबे यांचे आवाहन
◻आ. थोरातांनी संगमनेरच्या विकासात कधीही राजकारण केले नाही
संगमनेर Live | शहरात होऊ घातलेल्या एसटीपी प्रकल्पामुळे नाटकी नाल्याच्या परिसरातील दुर्गधी आणि अस्वच्छता हटणार आहे, आरोग्याला कोणताही धोका होणार नाही. एस. टी. पी प्रकल्पाला होत असलेला विरोध नगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केला जात आहे. आ. थोरात यांचे नेतृत्व सर्वाना सोबत घेणारे आहे, विकासात त्यांनी कधीही राजकारण केले नाही, असे नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले.
डॉ. तांबे म्हणाले, आ. थोरात यांनी सर्वांना सोबत घेऊन संगमनेरच्या विकासाला गती दिलेली आहे. त्यांनी निळवंडे धरणातून थेट पाइपलाइनद्वारे संगमनेर शहराच्या पुढील ५० वर्षांच्या पिण्याच्या आणि वापराच्या पाण्याचा प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे शहराला मुबलक पाणी मिळाले आणि पाण्याचा वापरही वाढला. अशा परिस्थितीत सांडपाणी देखील वाढले. प्रवरा नदीपात्रात हे सांडपाणी जाऊ लागल्यामुळे प्रदूषणाचे प्रश्न निर्माण झाले. राज्याच्या आणि केंद्राच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून या बाबतीत संगमनेर नगरपालिकेला वारंवार नोटिसा आल्या. नगरपालिका प्रशासनाला प्रदूषण नियंत्रण मंडळाने एस. टी. पी प्रकल्प उभा करण्याच्या कडक सूचना दिल्या.’
डॉ. तांबे पुढे म्हणाले, ‘ज्या ठिकाणी सांडपाणी वाहून येते त्याच ठिकाणी एस. टी. पी प्रकल्प असतो, प्रशासनाकडून नाटकी नाल्याशेजारील यंग नॅशनल ग्राउंडच्या जागेवर एसटीपी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव केला. वर्षानुवर्षे नाटकी नाल्याच्या परिसरात सांडपाणी वाहून येत होते. प्रशासनाला इतरही अनेक जागा शोधायला लावल्या, परंतु जागा उपलब्ध नव्हती आणि सदर जागा नगरपालिकेच्या मालकीची होती, त्यामुळे प्रशासनाने ही जागा नक्की केली. सुरुवातीला या भागातील बहुतांश तरुणांनी यंग नॅशनल ग्राउंड वाचवण्याची विनंती केली, आ. थोरात यांनी या मैदानाला विविध निधीतून कंपाऊंड, स्टेज, तालीम करून दिले होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नवी आझाद यांच्या हस्ते या मैदानाचे उद्घाटन झाले, त्यामुळे प्रशासनाने तज्ञांशी चर्चा करून मैदान वाचविले.’
‘संवाद आणि चर्चा करूनच हे ठरविले जात होते, मात्र संगमनेरचा विकास डोळ्यात खुपणाऱ्या काही मंडळींनी नगरपालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन या प्रकरणात उडी घेतली. नागरिकांच्या मनात गैरसमज पसरविला, अनेक खोट्या चुकीच्या आणि अशास्त्रीय गोष्टी सांगून नागरिकांच्या मनात भीती निर्माण केली. नाटकी नाल्यातील गटार वर्षानुवर्षे वाहते आहे, तेथे राहणाऱ्या नागरिकांना डास व दुर्गंधीचा त्रास होता.
एस. टी. पी. प्रकल्पामुळे नाटकी नाल्यातील सांडपाण्याची दुर्गंधी हटणार आहे. अनेक नागरिकांना प्रशासन शिर्डी येथे घेऊन गेले, एस. टी. पी प्रकल्प दाखविला. तेथे लोकवस्ती आहे, दुर्गधी येत नाही आणि नागरीकांच्या आरोग्याला धोका नाही, हे निदर्शनास आणून दिले. अन्य शहरातही एस. टी. पी प्रकल्प हे लोकवस्तीत असल्याचे नागरिकांना दाखवून दिले.
संगमनेर मधील अभियांत्रिकी महाविद्यालय, कारखाना, शैक्षणिक आणि औद्योगिक संस्था, हॉस्पिटलमध्ये एस. टी. पी प्रकल्प आहेत, यातून नागरिकांच्या आरोग्याला कोणताही धोका नाही आणि दुर्गधीही नाही. उलट आता नाटकी नाला परिसरात असलेल्या दुर्गंधीमुळे जो त्रास होतोय तोही कमी होईल. शिवाय या जागेला केंद्र आणि राज्य सरकारच्या तज्ज्ञ लोकांनी मान्यता देतांना, परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्राधान्याने विचार केला, असेही डॉ. तांबे म्हणाले.
‘त्यांच्या’ प्रश्नामुळे साडेपाच कोटींचा.. दंड
मार्च महिन्यामध्ये झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात ११ मार्च रोजी आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर शहरातून होणाऱ्या प्रदूषणाचा प्रश्न जाणीवपूर्वक विधानसभेत उपस्थित केला त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून संगमनेर नगरपालिकेला ५.४० कोटी रुपयांचा दंड आकारण्यात आला आणि एस. टी. पी प्रकल्प मुदतीत न उभारल्यास दर महिन्याला ३० लाख रुपये अतिरिक्त दंड ठोठावला आहे, हे देखील लक्षात घ्या, असेही डॉ. तांबे म्हणाले.
आ. थोरातच मदतीला धाऊन येतात..
डॉ. तांबे म्हणाले, ‘’संगमनेर शहराच्या विकासासाठी आ. थोरात यांनी कायम राजकारण बाजूला ठेवून काम केलेले आहे. राजकारण आणि जातीधर्माच्या पलीकडे जाऊन, आ. थोरात कायम सर्वांच्या मदतीला धाऊन आलेले आहेत. आता देखील संबधितांनी या प्रश्नाबाबत आ. थोरात यांच्याकडे चर्चा करण्यासाठी पुढे यावे. याबाबत वेळप्रसंगी प्रदूषण नियंत्रण मंडळाशीही चर्चा करता येईल, मात्र नागरिकांनी बाह्यशक्ती आणि त्यांना मदत करणारे उपद्व्यापी लोक यांना वेळीच ओळखावे आणि कोणत्याही भूलथापांना बळी पडू नये.’’