◻ सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांचे टिकास्त्रं
◻ कॉग्रेस तालुका अध्यक्षांकडे मागीतला खुलासा
◻ आ. विखे पाटील तालुक्यात आल्याने अनेकांना मिर्ची झोंबली
संगमनेर Live | ज्यांच्या राजकारणाची सुरुवात कॉग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारा विरोधात बंडखोरी करुन झाली त्यांच्या बगलबच्चांनी कॉग्रेस निष्ठेच्या गोष्टी विखेंना शिकवू नये, शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी पक्षासोबत जाताना थोरातांची कॉग्रेस निष्ठा आणि ध्येयधोरण कुठे गेले होते याचा खुलासा कॉग्रेस तालुका अध्यक्षांनी करावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी दिले आहे.
उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्ताने घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयात आयोजित केलेल्या आरोग्य शिबीराला भेट देण्यासाठी आ. राधाकृष्ण विखे पाटील आले होते. यावेळी त्यांनी कोणावरही व्यक्तिगत टिका केलेली नाही ही वस्तुस्थिती असताना सुध्दा तालुक्यात त्यांच्या येण्याची मिर्ची अनेकांना झोंबली, त्यांचा निषाणाही बरोबर लागला त्यामुळे धास्तावलेल्या थोरात, तांबे यांच्या बगलबच्चांनी जाणीवपूर्वक सुरु केलेली पत्रकबाजी अतिशय केविलवाणी असल्याची टिका खताळ यांनी एका प्रसिध्दी पत्रकात केली आहे.
या पत्रकात अमोल खताळ यांनी पुढे म्हटले आहे की, आ. विखे पाटील हे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यामुळे तसेच गेली अनेक वर्षे ते करीत असलेल्या सामाजिक कामांमुळे ते मोठे झाले आहेत. कोव्हीड संकटात संपूर्ण जिल्हाभर त्यांनी सेवाभावी वृत्तीने केलेले काम जनतेने पाहीले आहे. मात्र संगमनेर तालुक्यात कोव्हीडच्या संकटात जनता कशी वाऱ्यावर सोडली गेली होती याचा अनुभवही लोकांनी घेतला आहे. नगरपालिकेचे कॉटेज रुग्णालय बंद करुन, शहरातील नागरीकांची अडचण होत आहे. या नेमक्या समस्येवर आ. विखे पाटील यांनी बोट ठेवल्यामुळेच थोरातांच्या बगलबच्चांचे पित्त खवळले आहे.
महाराष्ट्रात थोरातांमुळेच कॉग्रेसला ग्रहन लागले हे राज्याने पाहीले आहे. आपल्या निष्ठा पवारांच्या पायावर ठेवून कॉग्रेस संपविण्याचे पाप करणाऱ्या थोरात तांबेंच्या बगलबच्चांनी आता कॉग्रेस निष्ठेवर बोलावे याचे आश्चर्य वाटते असा टोला लगावून सत्ता गेल्याचे दुख आम्ही समजू शकतो. परंतू अजूनही सत्तेची हाव आणि मोह सुटत नाही हे पुढे मागे पोलिस गाड्या घेवून फिरतानाचे चित्र हास्यास्पद वृत्तीने तालुका पाहत आहे. केवळ वाळू माफीया, साखर चोर, जमीन घोटाळे यांच्या जिवावर राजकारण करुन, ग्रामीण भागात दहशत निर्माण करणारेच आता कॉंग्रेस पक्षात दिसत असल्याचा आरोपही अमोल खताळ यांनी केला.
सुसंस्कृत राजकारणाचा दिखावा आणि मुखवटा घेवून मिरवणाऱ्यांनी तालुका आणि कॉग्रेस पक्ष केवळ प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करुन, केवळ ‘निर्मिती’ करत असल्याचा आव आणला आहे. याच अवैध धंद्यातील व्यक्तिंना आता पक्षाची पदं देवून राजकारण सुरु केले आहे. मात्र ज्यांच्यावर पदाची जबाबदारी आहे त्यांचा इतिहासही जनतेने अनुभवला आहे. प्रशासनातील आधिकाऱ्यांना जवळ करुन, आपले उखळ पांढरे करणाऱ्यांच्या धांदरफळ येथील शाळेसाठी वाळूचा साठा कसा सापडला त्याचा पंचनामा अर्धवट कसा राहीला हे सुध्दा भविष्यात आता बाहेर येईलच असा इशाराही शेवटी अमोल खताळ यांनी दिला आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना शिवसेनेसारख्या हिंदुत्ववादी सरकार सोबत जाताना थोरातांची कॉग्रेस निष्ठा आणि ध्येयधोरण कुठे गेले याची स्पष्टता तालुका अध्यक्ष मिलिंद कानवडे यांनी करावे असे आवाहनही अमोल खताळ यांनी केले आहे.