◻ नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण
संगमनेर Live (मुबंई) | औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याबाबतच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असू बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
नामकरणाबाबतच्या प्रस्ताव मंजुरीचे २९ जून २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हे दोन्ही प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हे प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आले. त्यावर या दोन्ही प्रस्तावांना मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
हे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यात येऊन त्यानंतर त्याप्रमाणे विभाग, जिल्हा, तालुका तसेच महानगरपालिका व नगरपालिका यांचे नामांतर करण्यात येईल. याबाबतची कार्यवाही स्वतंत्रपणे महसूल व वन विभाग तसेच नगरविकास विभागाकडून अधिनियमांप्रमाणे करण्यात येणार आहे.
नवी मुंबई विमानतळाचे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ नामकरण
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ’ असे नामकरण करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
नामकरणाबाबतचा प्रस्तावाच्या मंजुरीचे २९ जून २०२२ रोजीच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीचे कार्यवृत्त मान्यतेसाठी नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळासमोर आणण्यात आले होते. त्यावर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी फेरसादर करावेत असे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार हा प्रस्ताव आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत फेरसादर करण्यात आला व त्याला मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
नवी मुंबईमधील प्रकल्पग्रस्तांच्या मागणीनुसार १२.५६ योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्व. पाटील यांचे योगदान आहे. तद्नंतर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी संपादित जमिनीसाठी मोबदला ठरवावयाच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेले २२.५ योजनेचे धोरणसुद्धा १२.५ टक्के धोरणाच्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे.
नवी मुंबई येथे सिडको महामंडळाच्या माध्यमातून ११६० हे. क्षेत्रावर सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ग्रीनफील्ड विमानतळ विकसित करण्यात येत आहे. या संपूर्ण ११६० हे. जमिनीचे संपादन पूर्ण झाले असून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाची भूविकास कामे प्रगतीपथावर आहेत. या विमानतळाच्या नामकरणाच्या अनुषंगाने नवी मुंबईमधील विविध संघटना व राजकीय पक्षांकडून मागणी करण्यात येत होती.
नवी मुंबई परिसरातील विकासामधील दि. बा. पाटील यांचे योगदान व स्थानिकांच्या विविध संघटनांची मागणी विचारात घेता, नवी मुंबईत होत असलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळ असे करण्यास आज मान्यता देण्यात आली.