◻ सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
◻ जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेचे लोणी येथे आयोजन
संगमनेर Live (लोणी) | शारिरीक तंदुरुस्ती बरोबरच व्यक्तिमत्व विकासासाठी मैदानी खेळांची आवश्यकता आहे. क्रिडा स्पर्धेंच्या माध्यमातून मिळणारे प्रोत्साहन खेळाडूंना पुढे जाण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरेल असा विश्वास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील यांनी व्यक्त केला.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था आणि अहमदनगर जिल्हा अँम्यूच्यर अँथेलॅटीक्स असोशिएशन यांच्यावतीने जिल्हा स्तरीय मैदानी स्पर्धेंचे आयोजन लोणी येथील पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयात करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ.शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
याप्रसंगी क्रिडा व युवक संचलनालयाचे उपसंचालक महादेव कसगावडे, जिल्हा क्रिडा आधिकारी भाग्यश्री बिल्ले, राकेश सावे, शिवछत्रपती पुरस्कार विजेजे सुनिल जाधव, सचिन भालेराव, विखे पाटील महाविद्यालयाच प्राचार्य डॉ. प्रदिप दिघे, संस्थेच्या डायरेक्टर सौ. लिलावती सरोदे आदी उपस्थित होते.
सर्व खेळाडूंना शुभेच्छा देताना सौ. शालिनीताई विखे पाटील म्हणाल्या की, दोन वर्षांच्या कोव्हीड संकटानंतर प्रथमच संपन्न होत असलेल्या मैदानी स्पर्धेचे वातावरण पाहून मोठे समाधान मिळाले आहे. या संकटामुळे सर्वच मैदानी खेळ थप्प झाले होते. परंतू पुन्हा नव्याने उभारी घेवून या स्पर्धेंचे आयोजन केल्याबद्दल संयोजकांचे कौतूक करुन, या मैदानी स्पर्धांमध्ये सातत्य राखण्याचे आवाहन त्यांनी केले.
मानवी जिवनामध्ये शारिरीक तंदुरुस्तीसाठी तसेच व्यक्तीमत्व विकासासाठी सुध्दा मैदानी खेळांची नितांत आवश्यकता आहे. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे खेळाडूंना प्रोत्साहन मिळतेच परंतू पुढील स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी संधीही मिळतात. आज शहरांबरोबरच ग्रामीण भागातील खेळाडूही विविध मैदानी खेळांमध्ये नैपुन्य दाखवित आहेत.
जिल्हा स्तरावर किंवा तालुका स्तरावर संपन्न होणाऱ्या अशा स्पर्धामधुनच या खेळाडूंना नवी दिशा मिळते. विभागीय स्तरावर तसेच राज्य स्तरावर जाण्यासाठी या स्थानिक पातळीवर होणाऱ्या स्पर्धा निश्चितच खेळाडूंमध्ये नवा आत्मविश्वास निर्माण करणाऱ्या ठरतात असे त्यांनी नमुद केले.
लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी नेहमीच शिक्षण संस्थामधून खेळासाठी प्राधान्य दिले. सर्वच संस्थामध्ये मैदानाबरोरबच क्रिडा साहित्याची उपयुक्तताही त्यांनी करुन दिली. ग्रामीण भागात चांगले खेळाडू घडावेत हा त्यांचा विचार संस्थेने अशा स्पर्धांमधून जोपासण्याचे काम सुरु ठेवले असल्याचे सौ. विखे पाटील म्हणाल्या.
दरम्यान दोन दिवस चालणाऱ्या स्पर्धेमध्ये थाळी फेक, गोळाफेक, धावणे आदि क्रिडा प्रकार संपन्न होणार आहेत. या स्पर्धेमध्ये जिल्ह्यातील १५०० खेळाडू सहभागी झाले असल्याची माहीती प्राचार्य डॉ. प्रदिप दिघे यांनी दिली.